Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

सभापती मा. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या सहकार्याने अमोल साखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; कोळे येथे ०८ शिक्षकांची नियुक्ती

 सभापती मा. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या सहकार्याने अमोल साखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; कोळे येथे ०८ शिक्षकांची नियुक्ती




कोळे : कोळे गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील तसेच केंद्रशाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत साहेब यांच्या सहकार्याने अमोल साखरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, कोळे येथील विविध शाळांमध्ये एकूण ०८ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


कोळे गावातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अमोल साखरे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत संबंधित प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि प्रत्येक शाळेला आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.


या पाठपुराव्यास श्री. बाळासाहेब एरंडे मालक तसेच ॲड. सचिन लक्ष्मण देशमुख यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत कोळे येथील विविध वाड्या-वस्त्यांवरील शाळा तसेच केंद्रशाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यात आली असून, एकूण ०८ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी करण्यात आलेल्या मागणीची तातडीने दखल घेऊन सहकार्य केल्याबद्दल शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत साहेब यांचे अमोल साखरे यांनी मनःपूर्वक आभार मानले.


या निर्णयामुळे कोळे परिसरातील विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनाची सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार आहे.


“कोळे गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि पुरेसे शिक्षण मिळावे, यासाठी प्रश्न मांडणे, त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि तो मार्गी लागेपर्यंत प्रयत्न करत राहणे, हीच माझी भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी यापुढेही माझा पाठपुरावा सुरूच राहील,” असे अमोल साखरे यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांचे हित हेच सर्वोच्च ध्येय! 📚✏️


— अमोल अशोक साखरे


 

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२६

मांगले ते अक्कलकोट पायी दिंडीचे ४ सप्टेंबरला वाटंबरे नगरीत भव्य आगमन

 मांगले ते अक्कलकोट पायी दिंडीचे ४ सप्टेंबरला वाटंबरे नगरीत भव्य आगमन





(महाप्रसाद अन् 'डमरू-संबळ' नादाने रंगणार भक्ती गीतांची मैफल )


 (विशेष प्रतिनिधी):'

श्री स्वामी समर्थ' नामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मार्गस्थ झालेल्या मांगले ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष असून, या भव्य सोहळ्याचे आगामी शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी वाटंबरे नगरीत अभूतपूर्व उत्साहात आगमन होत आहे. या स्वागतासाठी येथील ऐतिहासिक श्री माणकेश्वर-दत्त मंदिर परिसर संपूर्ण सज्ज झाला असून, यानिमित्ताने विविध धार्मिक उत्सवांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे.रविवार, ३० ऑगस्ट रोजी मांगले येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व साई समर्थ हॉल येथून प्रस्थान केलेली ही पायी दिंडी वाटंबरे येथे दाखल होणार आहे. 

*या सोहळ्याचे अचूक वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:*

भव्य मिरवणूक आणि स्वागत (सकाळी १०:१५ ते १२:००): सकाळी ठीक १०:०० वाजता दिंडीचे वाटंबरे येथे आगमन होईल. त्यानंतर १०:१५ वाजल्यापासून स्वामींच्या पालखीची आणि दिंडीची गावातून वाजत-गाजत भव्य स्वागत मिरवणूक काढली जाईल.


*महाआरतीचा सोहळा* (दुपारी १२:०० ते १२:३०): मिरवणुकीनंतर श्री माणकेश्वर-दत्त मंदिर परिसर स्वामी भक्तांच्या उपस्थितीत आणि मंत्रोच्चारात होणाऱ्या 'महाआरती'ने दुमदुमून निघेल.

*अन्नदान व महाप्रसाद*

 (दुपारी १२:३० ते ३:००): दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी आणि दिंडीतील वारकऱ्यांसाठी तृप्त करणाऱ्या महाप्रसाद आणि फलाहाराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

*पुढील प्रस्थान* 

(दुपारी ३:०० वाजता): दुपारी ३:०० वाजता चहा-पानाचा आस्वाद घेऊन ही दिंडी अक्कलकोटच्या दिशेने पुढील मार्गासाठी मार्गस्थ होईल.


*पारंपरिक वाद्यांचा कडकडाट; कोल्हापूरच्या डवरी समाजाची भक्ती मैफल!*

यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, महाप्रसाद सुरू असतानाच दुपारी १२:३० ते ३:०० या वेळेत कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध 'नाथपंथी डवरी समाज भजनी मंडळ खोचीकर' यांच्या वतीने 'सुरेल भक्ती गीतांची मैफल' रंगणार आहे. यामध्ये डमरू वाद्य आणि संबळ-ढोलकी या पारंपरिक, अंगावर रोमांच उभे करणाऱ्या वाद्यांच्या तालावर भक्तांना मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण अनुभवता येईल.हा सुवर्णयोग साधत वाटंबरे आणि परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी, अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामीदर्शन, स्वामी सेवा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आग्रहाचे व नम्र आवाहन सोहळा संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास

 हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास 



बलवडी येथे हुतात्मा महादेव शिंदे स्मारकाचे अनावरण संपन्न


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

       

बलवडी गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व शौर्याचा आहे कारण 59 वर्षानंतर सुद्धा गावकऱ्यांच्या मनात वीर सुपुत्र हुतात्मा महादेव शिंदे व वीर माता पद्मिनी आई शिंदे यांच्या बद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी दिसून येत आहे. त्याबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद तर देतोच परंतु माझे भाग्य आहे की माझ्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले व मला कार्यक्रमात भाग घेता आला त्यामुळे हुतात्मा महादेव शिंदे यांना प्रथम अभिवादन करतो व बलवडी गावात हुतात्मा भवन साठी 50 लाखाच्या निधीची घोषणा करतो असे सांगून हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बलवडी ता. सांगोला येथे बोलताना व्यक्त केला. 


या स्मारक अनावरण प्रसंगी अध्यक्षस्थानी मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख हे होते. 

     ऊन, वारा, पावसामध्येही देशाचे रक्षण करणारा सैनिक महत्त्वाचा घटक असून त्याची देश सेवा संपली तरी देशप्रेम संपत नाही व विजयदादा शिंदे यांनी ही गावाची योगदान असल्याचे सांगितले तसेच वीर माता पद्मिनी आई यांनी कुटुंब उभारून ताकद दिली व त्यामुळे साठ वर्षानंतर पुन्हा त्यांना वंदन करताना त्यांचे योगदान विचारात घ्यावे लागेल. असेच मान नदीत पाणी सोडले व आता विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावू व देशासाठी शिंदे कुटुंबाचा त्याग मोठा आहे असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले. 

   सुरुवातीस प्राचार्य संभाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तसेच हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून एक सांगोला तालुक्यात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले. सदर प्रसंगी वीरमाता पद्मिनी आई शिंदे व सुभेदार राजेंद्र धायगुडे यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भजनी मंडळ व गजी ढोल या पारंपारिक वाद्याने कार्यक्रमात रंगत आणली. शिंदे कुटुंबास सर्व गावांनी सहकार्य केले व सर्वांनी मिळून समाधी स्थळ उभारले व त्यामुळे सर्वांच्या ऋणात राहू असे माजी सरपंच विजय दादा शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार बाळू ताई भागवत, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, भाजपा नेते बाळासाहेब एरंडे, शिक्षण सभापती चेतन सिंह केदार, सभापती पुनम ताई इंगोले, जि प सदस्य शोभाताई खटकाळे, माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, माजी सभापती संभाजी तात्या आलदर, पानंद रस्ते सह अध्यक्ष सचिन देशमुख, ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील, आरपीआय अध्यक्ष खंडू सातपुते, डॉक्टर शिवराज भोसले, मच्छिंद्र मामा इंगोले, युवा नेते उल्हास दादा धायगुडे, अमर दादा लिगाडे, पोपटराव गडदे, प्रशांत वलेकर, चेअरमन संजय धायगुडे, चेअरमन शिवाजी शिंदे, नगरसेवक बाळासाहेब झपके, सरपंच ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, समाधान शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व संचालक, शिक्षक नेते रमेश शिंदे व सर्व परिवार, ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी सैनिकांची लक्षणे उपस्थिती होती.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन शिक्षक तात्यासो शिंदे तर सर्वांचे आभार माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले.


१) पालकमंत्र्यांकडून हुतात्मा भवनसाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा 


हुतात्मा महादेव शिंदे यांनी देशाच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे निश्चितपणे प्रेरणादायी आहे. येणाऱ्या पिढ्यांना या स्मृतिस्थळावरून नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त करताना या परिसरात नवीन हुतात्मा भवन उभारण्यासाठी  ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. 


    

२) शिंदे व साळुंखे कुटुंबांचे ऋणानुबंध.


    हुतात्मा महादेव शिंदे व ह.भ.प. स्व. शारदाताई साळुंखे पाटील यांचे बहीण भावाचे नाते होते व यापुढेही शिंदे व साळुंखे कुटुंबाचे ऋणानुबंध संबंध राहतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मान नदीत पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आता यापुढे त्यांनी पाण्याबरोबर विजेचा प्रश्न व पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावावेत. 

दिपकआबा साळुंखे पाटील,

माजी आमदार 



फोटो ;

रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

अमृत महोत्सवाचे सुवर्णपर्व: करांडे स्कूलमध्ये ४७ पत्रकारांचा गौरव*

 *अमृत महोत्सवाचे सुवर्णपर्व: करांडे स्कूलमध्ये ४७ पत्रकारांचा गौरव* 



सांगोला (प्रतिनिधी)

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२७ निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, ड्रीम फाउंडेशन सोलापूर, करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने जुजारपूर येथील करांडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून समाजाच्या आशा-आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच समाजप्रबोधनाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक, दैनिक सकाळचे माजी निवासी संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अभय दिवाणजी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे व म.सा.प. सांगोला शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके हे होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे व समन्वयक, म.सा.प प्रमुख कार्यवाह प्रा. धनाजी चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर येथे पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर करांडे स्कूल जुजारपूर येथे विद्यार्थ्यांच्या बहारदार स्वागतसत्राने तसेच गणेश वंदन आणि सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा व मल्लखांबाचे चित्तथरारक सादरीकरण केले. यावेळी श्रीधर करांडे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित पत्रकारांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर, निमंत्रक आणि ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या ओघवत्या प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाचा मुख्य हेतू स्पष्ट केला. स्वतः शून्यातून विश्व निर्माण करणारे, सायकलीवरून थेट दिल्ली गाठणारे आणि 'भाकरीवाला' अशी सर्वसामान्यांत आपली आगळीवेगळी ओळख जपणारे भतगुणगी हे एक ध्येयवेडे आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मनोगतातून, पत्रकारांना एकाच छताखाली आणून वैचारिक विचारमंथन घडवणे आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव करणे, हाच या कार्यक्रमाचा उदात्त उद्देश असल्याचे सांगत सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यानंतर उद्घाटन सत्रामध्ये अभय दिवाणजी यांचे बीजभाषण पार पडले. यावेळी पत्रकारांच्या वतीने पत्रकार मनोज उकळे यांनी आपल्या मनोगतात या सुंदर आयोजनासाठी संयोजकांचे कौतुक केले.चौथा स्तंभ म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या  सांगोला तालुक्यातील ४७ पत्रकारांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, विविध क्षेत्रांतील मान्यवर, म.सा.प. सांगोला शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, करांडे कुटुंबीय,करांडे स्कूलचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जावंजळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. धनाजी चव्हाण यांनी मानले.

 *चौकट १* 

 *पत्रकारितेने समाजाचा आरसा बनून सत्यनिष्ठेने कार्य करावे — ज्येष्ठ* पत्रकार अभय दिवाणजी

आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी पत्रकारितेतील बदलते स्वरूप आणि डिजिटल युगातील आव्हाने यावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सध्याच्या सोशल मीडियाच्या आणि वेगाने धावणाऱ्या बातम्यांच्या काळात बातमीदारीची अचूकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. पत्रकारांनी केवळ घटनांची नोंद न ठेवता, त्यामागील सत्य शोधून काढत बातमीतील वस्तुनिष्ठता जपावी. वृत्तलेखनाची जबाबदारी पार पाडताना समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हे पत्रकारितेचे खरे सामाजिक उत्तरदायित्व आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण जडणघडणीत येथील स्थानिक पत्रकारांनी दिलेले योगदान अत्यंत दिशादर्शक असून, भविष्यातही लोकशाहीचा हा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भयपणे, निपक्षपातीपणे आणि सत्यनिष्ठेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 *चौकट २* 

 *अमृत महोत्सवी वाटचालीत पत्रकारांची भूमिका मोलाची — प्रा. प्रबुद्धचंद्र झपके* 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ७५ वर्षांच्या देदीप्यमान अमृत महोत्सवी वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, गेली सात दशके संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, गुणवत्ता आणि शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत  प्रयत्न केले आहेत. या प्रदीर्घ शैक्षणिक ज्ञानयज्ञात पत्रकारांनी नेहमीच सत्याची कास धरून संस्थेचे कार्य समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोलाचे काम केले. समाजातील घडामोडींचे अचूक पडसाद उमटवतानाच पत्रकारांनी आपल्या विधायक लेखणीतून नेहमीच समाजमनाची योग्य बांधणी केली आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना, पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करता आला याचा मनस्वी आनंद आहे. पत्रकारांनी भविष्यातही अशीच निर्भीडपणे सत्याची बाजू मांडावी आणि समाजाला प्रबोधनाची व विकासाची दिशा देण्याचे कार्य अविरत सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

कोळा येथे स्व. आ. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादात संपन्न*

 *कोळा येथे स्व. आ. भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उदंड प्रतिसादात संपन्न*









कोळा : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, स्वर्गीय आमदार भाई डॉ. गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या शताब्दी जयंती वर्षा निमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास कोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सदरचे शिबिर दक्षता हॉस्पिटल , श्री हॉस्पिटल आणि लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने संपन्न झाले. या शिबिरामध्ये मोफत सर्वरोग, मुतखडा व मूत्ररोग तपासणी करण्यात आले असून गरजू रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया शिबिरा अंतर्गत मोफत करण्याचे आयोजन करण्यात आले.

            शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन या वेळी जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर यांच्या शुभ हस्ते झाले.स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी कोळा पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी तसेच या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. सोपान दाजी कोळेकर, सूत गिरणी चे संचालक श्री कुंडलिक आलदर सर, दिलीप देशमुख, माजी सरपंच मारुती सरगर सर, माजी सरपंच शहाजी हातेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री सीताराम सरगर, माजी ग्रा. प. सदस्य रमेश नाना कोळेकर, ग्रा प सदस्य शिवाजी आलदर, माजी उपसरपंच डॉ. सादिक पटेल, अशोक आबा आलदर, ग्रा. प. सदस्य दिलीप कोळेकर, ग्रा. प. सदस्य दगडू कोळेकर, ऍड धायप्पा आलदर, ऍड निलेश मदने, युवा नेते दत्ता सरगर, बाळासाहेब कोळेकर, अंबादास सरगर डॉ. बापूसाहेब सरगर,श्रीमती वंदना संजय सरगर, जुनोनी सोसायटीत चे चेअरमन बंडू व्हनमाने, युवक कार्यकर्ते अजर खाटीक, तुषार माने,दक्षता हॉस्पिटलच्या वतीने डॉ. किरण संजय सरगर-मस्के , डॉ. निरंजन केदार, श्री हॉस्पिटलचे डॉ. सागर तेली दक्षता हॉस्पिटल चा सर्व नर्सिंग स्टाफ ,धनराज ॲम्बुलन्सचे श्री.सचिन चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.

          या शिबिरात विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तसेच मूत्ररोगाच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्याउपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसंदर्भातही सल्ला देण्यात आला.

              या आरोग्यसेवा उपक्रमाला कोळा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेत आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

सण, उत्सव, निवडणुकीत सहकार्य करावे.. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे* *पो.नि. राहुल देशपांडे यांचा सत्कार संपन्न..*

 *सण, उत्सव, निवडणुकीत सहकार्य करावे.. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे* 

 *पो.नि. राहुल देशपांडे यांचा सत्कार संपन्न..* 


सांगोला प्रतिनिधी 

      सण, उत्सव व निवडणूक काळात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे व त्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे कारण त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची ही सोडवणूक होते असे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. 


     सुरुवातीस सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या शुभहस्ते पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला व पोलीस प्रशासनास सहकार्य राहील असे रविराज शेटे यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, उपनगराध्यक्ष नितीन आबा इंगोले, पत्रकार सचिन धांडोरे, पत्रकार दत्तात्रय पवार, विनोद चंदनशिवे, करण मोरे, अक्षय मुढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन उपस्थित होते.



सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर.

 सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर. 

(सांगोला येथील प्रा.पी .सी. झपके व डॉ. सुदर्शन घेरडे यांची निवड)




सांगोला/प्रतिनिधी:

दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकरणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सांगोल्याचे प्राध्यापक पी .सी. झपके यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली तसेच सांगोला तालुक्यातील किडमिसरी गावचे सुपुत्र डॉ .सुदर्शन घेरडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आले.





 

सोलापूर जिल्हा परिषदेत ५०० शिक्षकांची भरती; शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी बळकटी! सभापती चेतनसिंह केदार-सावंत

 सोलापूर जिल्हा परिषदेत ५०० शिक्षकांची भरती; शिक्षण क्षेत्राला मिळणार नवी बळकटी! सभापती चेतनसिंह केदार-सावंत 



सोलापूर | प्रतिनिधी


सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ५०० शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, सदर भरतीची जाहिरात दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर व्हावी आणि प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी ही शिक्षक भरती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


“शिक्षण हा विकासाचा पाया आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही आमची प्राथमिकता असून, शिक्षकांची उपलब्धता वाढवून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे,” असे मत सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद, सोलापूर  श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.


या भरतीमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचून आवश्यक पात्रता व अटींची पूर्तता करून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


“शिक्षण मजबूत, तर सोलापूरचा भविष्यकाळ मजबूत!”




चौकट | 


५०० शिक्षक भरतीचा महत्त्वपूर्ण निर्णय


जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ५०० शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे. ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून ही भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी भरतीची जाहिरात शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्धता आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक बळकटी देणे, हा या भरतीमागील प्रमुख उद्देश आहे.


— श्री. चेतनसिंह केदार-सावंत

सभापती, शिक्षण व आरोग्य समिती

जिल्हा परिषद, सोलापूर


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

वासुद येथें स्व.आम.भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न*

*वासुद येथें स्व.आम.भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न*
*सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार भाई डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हनुमान मंदिर, वासुद येथे आयोजित मोफत सर्वरोग,मोफत मुतखडा- मूत्ररोग, मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर उदंड प्रतिसादात पार पडले. सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व रुग्णांची व वासुद ग्रामस्थांची आपुलकीने विचारपूस केली. स्व. आबासाहेबांचा विचार जपण्यात वासुद-अकोला ही क्रांतिकारी गांव नेहमी सांगोला तालुक्यात अग्रेसर राहत असतात असे मत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. शिबिरा निमित्त आबासाहेबांच्या आठवणींना वासुद ग्रामस्थ यांच्यावतीने उजाळा देण्यात आला. सदरच्या शिबिरामध्ये एकत्रित प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी मोफत तब्बल ५३ आयुष्यमान कार्ड वासुदवासीयांना काढून देण्यात आले.तसेच दक्षता हॉस्पिटल व केदार हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या.नँब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या वतीने मोफत नेतृत्व तपासणी चष्मे वाटप तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन हॉस्पिटल मार्फत शस्त्रक्रिया करण्याचे सुचवण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये तब्बल दीडशेहून अधिक रुग्णांनी व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. सदरचे शिबिर अतिशय उत्साहात वासुद येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडले.*

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२६

शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026रोजी उपोषण .: सतीश सावंत

 शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या  

घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026रोजी उपोषण .: सतीश सावंत 



सांगोला प्रतिनिधी :सांगोला येथे सांगोले नगरपालिका हद्दीतील शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या  

घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्र

असलेल्यांना बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा सांगोला नगरपालिकेची मा.बांधकाम समितीचे सभापती सतीश सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे व नागरिकांच्या प्रश्नासाठी उपोषण करणार असल्याचे सांगितले शासनाच्यावतीने महाराष्ट्र भर गोर-गोरीबांसाठी व ज्यांना घरे नाहीत त्यांच्यासाठी पतंप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधणे सुरू केली आहेत. या घरकुल योजनेमध्ये अनेकांना पैसे नसताना सुध्दा स्वतःची जागा असली तरी त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा शासनाने प्रयत्न केला. ज्यांना जागा नाही ताशांना जागा देऊनही शासन गुरुकुल बांधून देत आहे शासनाने गोरगरींबांसाठी चालू केलेल्या या घरकुल योजनेचा लाभ सांगोला शहरातील अनेक नागरिकांनी घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी क वर्ग नागपालिका आहे. या नगरपालिकेची स्थापना 10 जानेवारी 1855 रोजी झालेली आहे. याचे क्षेत्रफळ सुमार 68.82 चौ. कि.मी. आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोखसंख्या 40 हजारांपर्यत इतकी आहे. यामध्ये 13 वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. सांगोला शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सांगोला शहरात नागरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रीन झोन मध्ये पंतप्रधान आवास योजनेला बांधकाम परवानगी देण्यात यावी.

यापुर्वी सांगोला नगरपालिकेने ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले. त्यामुळे अनेकांनी घरे बांधली व अनेकांना या घरकुल योजनेचा लाभ घेता आला. परंतू नगरपालिकेेने अचानकच ग्रीन झोन मधील घरकुलाचे बांधकाम परवाने व वापर परवाने बंद केले. त्यामुळे अनेकांची घरे बांधण्याची स्वप्ने अर्धवटच राहिली अनेकजण नगरपालिकेमध्ये ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने मागण्यासाठी हेलपाटे घालतात परंतू त्यांची कसलीही दखल घेतली जात नाही. ग्रीन झोन मध्ये घरकुलासाठी बांधकाम परवाने व वापर परवाने दिले तर गोर-गोरीब नागरिक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेईल. व शासनाच्या या घरकुलाची योजना वाड्यावस्त्यापर्यंत पोहचेल त्यामुळे सांगोला शहरासह वाड्यावस्त्यावरील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा.

सध्या नगरपालिका प्रशासनाने वाड्यावस्त्यांवर पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या ग्रीन झोनमधील बांधकामाला 1एकर म्हणजे 40 आर क्षेत्राची अट लागू केली आहे. सर्वांची 40 गुंठे क्षेत्र नाही गोरगरिबांना गुंठा दोन गुंठे क्षेत्र आहे 40 आर क्षेत्र असेल तर ग्रीन झोनमध्ये बांधकाम परवाना दिला जाईल अशी अट घातली आहे. परंतु शहरातील वाढीव भाग व वाड्यावस्त्यांवरील नागरीक गरीब आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा लाभ घेणारे नागरिकांना 2 ते 3 गुंठेच्या वर क्षेत्र नाही. जर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला नसता. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणारे नागरीक 2 ते 3 गुंठे क्षेत्र असलेलेच लाभार्थी आहेत. नगरपालिका हद्दीत 2 ते 3 गुंठे ग्रीन झोनमध्ये क्षेत्र असलेल्यांना बांधकाम परवाना देत नसल्याने शासनाच्या या पंतप्रधान आवास योजनेमध्ये एकाही नागरिकाला याचा लाभ होत नाही. ही योजना पूर्णपणे सांगोल्यातून हद्दपार करण्याचा अधिकार्‍यांचा डाव आहे. तरी शासनाने व नगरपालिका प्रशासनाने ग्रीन झोनमध्ये 2 गुंठेच्या पुढे क्षेत्र असलेल्या ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधणार्‍या नागरिकांना बांधकाम परवानगी व वापर परवाना देण्यात यावा. यामुळे नगरपालिकेच्या कर आकरणी व पाणीपट्टीतही वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्र असणार्‍यांना बांधकाम परवाना व वापर परवाना देण्यात यावा. अन्यथा मी 15 ऑगस्ट 2026 रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले


शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”*

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला



महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास  सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते.


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.



यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


याप्रसंगी  आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी  मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, ३० जुलै, २०२६

कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*

 *कोळे येथे रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांची जयघोषात मिरवणूक संपन्न.. हजारो भाविकांनी घेतले स्वामींचे दर्शन..*



*महास्वामींच्या मठात शिवपाठ, पारायण, भजन, किर्तन, गुरु दीक्षा, रक्तदान, महाप्रसाद वाटप करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी..*

नाझरे प्रतिनिधी 

   !!गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजे प्रेमानंद, गुरु तोचि सच्चिदानंद, गुरुचे करा भजन, गुरु करी दुःख निवारण, गुरु माझा योगीराणा, गुरुपायी श्रद्धा हीच खरी गुरुदक्षिणा..!!

    हेच विचार मनात घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त कोळे ता. सांगोला येथील महास्वामींच्या मठात लाखो भाविकांनी नतमस्तक होऊन गुरु शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती गुरुपौर्णिमा दिवशी महास्वामीच्या मठात दिसून आली. गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, कोळेकर महास्वामी की जय, हर हर महादेव या जयघोषाने कोळेनगरी दुमदुमली व कोळेगावातून भव्य रथात मिरवणूक महास्वामींची काढून, जयघोष करून गुरुप्रती वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटक मधून हजारो भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले, कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व कोळेकर महास्वामीजी 31सावे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. 

    भारतीय संस्कृतीत गुरूला फार महत्त्व आहे, गुरु केवळ ग्रंथ शिकवणारा नसून योग्य मार्ग दाखवणारा आहे व संसार रुपी सागर पार करायचा असेल तर गुरुची गरज आहे व गुरुचरणाशी मस्तक टेकवणे गरजेचे आहे व प्रत्येकाने गुरुची सेवा करा यश प्राप्ती होईल असे कोळेकर महास्वामींनी आशीर्वाचनात सांगितले व सात दिवस सर्वांनी मिळून कार्यक्रम सुंदर केला तसेच प्रत्येकाने घरचे काम समजून मनातील सेवा केली व त्यामुळे कुदळे कंपनी, कोळे ग्रामस्थ, वीरशैव तरुण मंडळ, गुरु गादी मठ संस्थान पदाधिकारी, महिला, युवक, आबाल वृद्ध या सर्वांना गुरुचा आशीर्वाद आहे असेही महास्वामिनी यावेळी सांगितले. यावेळी असंख्य सेवेकरी यांचा गुरू गादी तर्फे सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत भजनी मंडळ, ढोल ताशा, वाजंत्री, गजी ढोल इत्यादीचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले.

*‌.. शेकडो भक्तांचे रक्तदान..*

  गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोळेकर महास्वामींच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पानंद रस्ते अध्यक्ष सचिन देशमुख, मा. उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, शिंदे मेजर, अमोल कोरे, दुर्वास शेटे व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी 175 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे रेवनील ब्लड बँकेचे सोमेश यावलकर यांनी सांगितले. 

*.. नेटके नियोजन..*

  गुरुपौर्णिमा उत्सव कमिटी, वीरशैव तरुण मंडळ व ग्रामस्थ कोळे यांनी नेटके नियोजन केले होते. यावेळी महाप्रसाद देणारे गुरुभक्त अर्जुन खरसुडे व परिवार तासगाव तसेच देणगीदार महादेव पैलवान, माया पैलवान व सौ मालन शिवपुजे यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. 

*.. लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ..*

सकाळी अकरा वाजल्यापासून रात्र बारा वाजेपर्यंत अन्नछत्र मंडळात लाखो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ‌ यावेळी सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले.

बुधवार, २९ जुलै, २०२६

वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी. धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.

 वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंटवर मेटल बीम बसविण्याची मागणी.

धोकादायक वळणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिक व वाहनचालकांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी.



वाटंबरे (प्रतिनिधी):

रत्नागिरी–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे येथील पांडेजी ढाब्यासमोरील कट पॉईंट हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसविण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

या कट पॉईंटवरून अकोला, वासूद, कडलास तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, कट पॉईंटच्या उत्तरेकडील बाजूस तीव्र वळण आणि उतार असल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग अधिक असतो. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांमुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण कायमस्वरूपी अपंग झाले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिक व वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या कट पॉईंटवर तातडीने मेटल बीम (क्रॅश बॅरिअर) बसवून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. 


फोटो:  वाटंबरे येथील अपघातप्रवण कट पॉईंट , उत्तरेकडून तीव्र गतीने येताना चार चाकी वाहन दिसत आहे .

सोमवार, २७ जुलै, २०२६

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन.

सत्यप्रकाश पवार यांचे अपघाती निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील वाॅटर फिल्टर खरेदी विक्रीचे उद्योजक सत्यप्रकाश पवार यांचे सोमवार दि. २७ जुलै रोजी अपघाती निधन झाले.
निधना समयी त्यांचे वय ३५ वर्ष होते. त्यांच्या अपघाती निधनाने वाटंबरे गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,मुले ,भाऊ असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीत होणार आहे याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

रविवार, २६ जुलै, २०२६

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन.

वृद्धापकाळाने जनार्दन पवार यांचे निधन. 

वाटंबरे/प्रतिनिधी:
वाटंबरे येथील जनार्दन पांडुरंग पवार यांचे शनिवार दि. 25 जुलै रोजी वयाच्या ८१ वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्यावर वाटंबरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,पत्नी ,नातवंडे ,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. 
त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी सात वाजून तिस मिनिटांनी वाटंबरे स्मशानभूमीमध्ये होणार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार

 कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते सन्मान ; विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सहृदय सत्कार 



चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 


राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती. ही संकल्पना जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समजली तेव्हा संपूर्ण राज्यभर अत्यंत प्रभावीपणे ही संकल्पना राबवून वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. 

सालाबादप्रमाणे पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे दोन दिवस माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले. 


चौकट ; 


१) चरणसेवा संकल्पनेच्या जनक ; ह.भ.प. भागवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील 


सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात. 


 आषाढी वारीमध्ये विक्रमी चरणसेवा केल्याबद्दल कै. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे आणि राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

गुरुवार, २३ जुलै, २०२६

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

 माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

 संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश





पंढरपूर (दि.22) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो . सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.



माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली , टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा ... आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. 


यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वागत केले. 


                                                     

शनिवार, १८ जुलै, २०२६

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील

२२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिर ; दिपकआबा साळुंखे पाटील 

मुख्यमंत्री सहायता कक्ष व काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम



सांगोला ; तालुका प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त देशभरातून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ जुलै रोजी नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथे दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात लोकसहभागातून वारकऱ्यांना आरोग्य तपासणी, औषधोपचार, चरणसेवा, अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
या शिबिराच्या नियोजनासाठी शनिवारी (१८ जुलै) नक्षत्र मंगल कार्यालय, मेथवडे फाटा येथे बैठक पार पडली. बैठकीस वाढेगाव, बामणी, मांजरी, संगेवाडी व शिरभावी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. 

यावेळी दिपकआबा म्हणाले, राज्यात परंपरा आणि संस्कृती जपणारे सरकार कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व सुनेत्रा वाहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या पुढाकारातून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच संकल्पनेतून हा सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाखो भाविक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे अनेक वारकऱ्यांना आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर शिबिरात वारकऱ्यांच्या पायांची आयुर्वेदिक तेलाने मालिश करून चरणसेवा, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वाटप तसेच अल्पोपहार व मुक्कामाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

वारकऱ्यांना आरोग्य, भोजन किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून या दोन दिवसीय चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.






रविवार, १२ जुलै, २०२६

सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव*

*सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव*
सांगोला | प्रतिनिधी
लोकप्रिय आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी, सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि सुर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धे मधील सहभागी स्पर्धक व विजेत्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
          यावेळी आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, सौ.निकिताताई देशमुख, मा. डॉ. प्रभाकर माळी (चेअरमन), सुर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा श्री. अनिलभाऊ इंगोले, मा. विजय राऊत, डॉ. विजय बंडगर, डॉ. संगीता पिसे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, डॉ. महेश राऊत, डॉ. संतोष पिसे, डॉ. वैभव जांगळे, डॉ. निरंजन केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          स्पर्धेत उत्कृष्ट रील निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक (₹५,००१) – सुशांत कोडक (एस. के. सिनेमॅटिक),द्वितीय पारितोषिक (₹३,००१) – साहिल वाघमारे (द साहिलग्राफी), तृतीय पारितोषिक (₹२,००१) – आर्यन लीपारे (झिरो सिनेमॅटिक) विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
          तसेच सिनेमॅटोग्राफर श्री. मकरंद भोरे, उमर बागवान आणि श्री. निलेश लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इरशाद बागवान यांनी प्रभावीपणे केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगोला मॅरेथॉन-२०२६ च्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत, सामाजिक उपक्रमांना तरुणांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे सांगितले. रील स्पर्धेमुळे सांगोला मॅरेथॉनचा संदेश मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचला असून, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे क्रीडा, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वासही आ. डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.

गुरुवार, ९ जुलै, २०२६

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरामाजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे

पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे 

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

सध्या राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे मात्र, सांगोला तालुक्यात पावसाने पाठ फिरवली आहे. कृष्णा कोयना भीमा पंचगंगा आणि नीरा नदीच्या पात्रातून पुराच्या रूपाने वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तत्काळ टेंभू उपसा सिंचन योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्याला सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, सांगोला तालुक्यात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवर होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांचे विहिरी, तलाव आणि कुपनलिका तसेच अन्य जलस्रोतांनी तळ गाठल्याने सांगोला तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही समस्या गंभीर होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यातील काही गावांना टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. एकीकडे कृष्णा, कोयना भीमा निरा पंचगंगा तसेच अन्य नद्यांच्या खोऱ्यात व घाटमाथ्यावर सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. या नदीकाठील लोकांचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या सांगोला तालुक्यातील माणगंगा, कोरडा, आफ्रुका आणि बेलवण यासारख्या नद्या मात्र ऐन पावसाळ्यात कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे कृष्णा, कोयना,भीमा, पंचगंगा आणि नीरा नदीतून वाहून जाणारे पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू उपसा सिंचन योजनेतून माणगंगा नदीत, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदीत आणि नीरा नदीचे पाणी सांगोला शाखा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास आणि या पाण्यातून सांगोला तालुक्यातील छोट्या मोठ्या तलावांना पाणी सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त अशा दोन्ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणून राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्याला दिलासा देण्यासाठी तात्काळ टेंभू योजना म्हैसाळ योजना आणि नीरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. 

चौकट ; 

पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ; मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कृष्णा, कोयना, निरा पंचगंगा या नद्यांच्या परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीच्या काठावरील लोकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरीही, पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगोला तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पुराचे अतिरिक्त पाणी टेंभू योजना, म्हैसाळ योजना व नीर उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडल्यास पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart