नाझरा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापुर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते संपन्न
“दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण”चा संदेश; प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन
सांगोला, दि. २८ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थित पालक व नागरिकांना मार्गदर्शन करताना सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “दोन थेंब… आयुष्यभराचे संरक्षण!” हा केवळ संदेश नसून प्रत्येक बालकाच्या निरोगी भविष्याची हमी आहे. पोलिओ हा लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्रत्येक पल्स पोलिओ मोहिमेत दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील दोन थेंब आवर्जून पाजावेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, ही प्रत्येक पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “निरोगी बालक हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती उपसभापती श्री. अजय सरगर, सांगोला पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप देवकते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओंकार कोरे, श्री. संजय शेळके, श्री. भालचंद्र भंडारे, श्री. रमेश पाटील, श्री. नामदेव आलदर, श्री. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य सहाय्यक अधिकारी डॉ. जिलानी काझी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका, परिचर, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचवूया… पोलिओमुक्त भारत घडवूया!” असा निर्धार व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा