महात्मा फुले वाचनालयात हळदी - कुंकू व सत्कार समारंभ संपन्न
उदनवाडी दि. 16. उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मकर संक्रातीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी - कुंकू, तीळ -गूळ वाटप व कु. स्नेहा संतोष बनसोडे हिचा सत्कार दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी करण्यात आला . सिंधुदुर्ग येथे झालेल्या ओपन नॅशनल तायक्यांदो स्पर्धेत ४९ ते ५२ किलो वजनी गटात कु. स्नेहा संतोष बनसोडे हिने सुवर्ण पदक मिळवले. नेपाळ देशात होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी तिची निवड झाली. त्याबद्दल महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा. मुकुंद वलेकर हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर हे होते.
माजी मुख्याध्यापक बापुसो गावडे गुरुजी, पत्रकार संतोष बनसोडे, रेश्मा संतोष बनसोडे हे मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा. मुकुंद वलेकर म्हणाले, कु. स्नेहा बनसोडे हिने तायक्यांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून स्वतःची व उदनवाडी गावाची मान उंचावली आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुयश मिळवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. महिलांनी विविध क्षेत्रात केलेली प्रगती सांगून स्नेहा बनसोडे हिच्या आई-वडिलांचे कौतुकही त्यांनी केले. महात्मा फुले वाचनालयाने महिलांसाठी हळदी- कुंकू व तीळ-गूळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वाचनालयाच्या उपक्रमशीलतेचे त्यांनी कौतुक केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर म्हणाले, कु. स्नेहा बनसोडे हिने तायक्यांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. स्नेहाच्या व तिच्या आई- वडिलांच्या जिद्द,चिकाटी आणि संघर्षाचा आदर्श घेऊन महिलांनी आपल्या मुलांनाही असे यश मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. महिलांनी स्वतःला कमी न लेखता जीवनात उज्ज्वल यश मिळवावे. टीव्ही व मोबाईलच्या अति आहारी न जाता चांगल्या ग्रंथांचे वाचन करायला हवे. महिलालांमधील स्नेह वाढावा यासाठी हळदी-कुंकू व तीळ-गूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाचनालयाच्या सचिव सौ. चिंगूताई विठ्ठल वलेकर यांनी केले. आभार ग्रंथपाल विजय वलेकर यांनी मानले. कार्यक्रमाला महिला, मुली व ग्रामस्थ उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा