Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० मार्च, २०२६

ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी

 ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी



(समर्थ संस्थेच्या श्रेयस ऑनलाईन सेंटरचे उद्घाटन संपन्न)


जत: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत श्रेयश कॉम्प्युटर व ऑनलाइन सर्विस सेंटर चे जत येथे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी व नगरसेविका संगीता सोनुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांनी शुभेच्छा देताना सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांकडे वेळ कमी असल्याने ऑनलाइन सेवा ही एक काळाची गरज बनली आहे. संस्थेने लोकांना कमी वेळेत व माफक दरात चांगल्या सुविधा देऊन आपला नावलौकिक वाढवावा. यावेळी नगरसेविका संगीता सोनुले मॅडम यांनी शुभेच्छा देताना समर्थ संस्थेने जत मधील महिलांना व्यवसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यास मदत करावी त्यासाठी आम्ही लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.





          यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. केंद्र संचालिका मनीषा साळे यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेमध्ये ऑनलाइन सुविधा बरोबर विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. केंद्र संचालिका अभिलाषा कोडग यांनी महिलांसाठी गृह उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजश्री उबाळे व आभार मयुरी सावंत यांनी मांडले. या कार्यक्रमास परशुराम ऐवळे, गोपाल पाथरूट,अविनाश सोनुले, वैभव जगधने,कविता मराठे,स्वाती बडचीकर, शारदा कांबळे,सुशील चव्हाण सर, कल्पना कणसे, विजय सावंत, परिक्षित चव्हाण,प्रताप चव्हाण,ज्योतीराम सावंत,पुनम सावंत,नयना सोनवने,भास्कर सोनवणेसर,प्रकाश कदम यांच्यासह जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

 वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन


वाटंबरे (ता. सांगोला) : गावातील सामाजिक व धार्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने येत्या रविवारी वाटंबरे येथे सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान खंडोबा मंदिरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ह. भ. प .मा. प्राध्यापक रामेश्वर महाराज जाधव , प्रमुख वक्ते योगेश शामराव कुलकर्णी, मातृशक्ती श्रीमती अर्पणाताई माणिक साळुंखे या मान्यवरांचे मार्गदर्शन, धार्मिक प्रवचने तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास वाटंबरे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संमेलनात हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून युवकांनाही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावात प्रथमच हिंदू संमेलनाचे आयोजन असल्यामुळे  या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : चेतन सिंह केदार सावंत.

 नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट  पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : चेतन सिंह केदार सावंत.



भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी




सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी, आंबा, पेरू यासह इतर फळबागांचे आणि ज्वारी, मका, गहू तसेच पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट  पंचनामे  करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे. 

        सांगोला शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पावसाने तसेच गारपीटीने झोडपल्याने डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, सीताफळ, चिकू यासह इतर फळबागा आणि रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू यासह तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतातील उभी पिके कोलमडून पडली तर द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीशी झगडत जतन केलेल्या फळबागा अवकाळी पावसाने उद्दवस्त झाल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरसकट पंचमाने करून भरपाई द्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळूताई भागवत यांच्याकडे केली आहे. 

      सांगोला तालुक्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसाळे शेती पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. अनेक शेतकरी आपली पिके जगवण्यासाठी संघर्ष करत होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून असा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करून  नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत यांनी केली आहे.



         


       

गुरुवार, १९ मार्च, २०२६

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न*

*दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न*
*जय भवानी चौक सांगोला येथिल उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यात अग्रेसर असणाऱ्या दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे नवीन सुसज्ज ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सर्व डॉक्टर्स मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन दक्षता हॉस्पिटल मधील सर्व डायरेक्टर्स, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, सर्व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पडले. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा या शुभ मुहूर्ता दिवशी व नवीन मराठी वर्षानिमित्त सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. 
दक्षता हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत मेडिसिन विभाग, हृदयरोग व कॅथलॅब विभाग, मुत्ररोग विभाग,डायलिसिस विभाग,बालरोग विभाग, सर्जरी व गॅस्ट्रो इंटरोलॉजी विभाग,अस्थीरोग विभाग कार्यरत आहेत. या विभागा अंतर्गत सध्या सुसज्ज आय.सी.यू, सुसज्ज कार्डियाक केअर युनिट , सुसज्ज ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब इत्यादी सुविधा उपलब्ध असून आज दक्षता हॉस्पिटल च्या वतीने"नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स" हे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू करून वैद्यकीय सुविधेची मुहूर्तमेढ रोवली आहे . या अत्याधुनिक सुविधेमुळे सांगोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणखीनच भर पडली आहे. या कार्यक्रमासाठी दक्षता हॉस्पिटल मधील डॉ.शिवराज भोसले,डॉ.दत्तात्रेय इंगोले, डॉ.प्रवीण पैलवान, डॉ. फिरोज तांबोळी, डॉ. सचिन लिगाडे,डॉ.निरंजन केदार, डॉ.महादेव जगताप,श्री.विलास इंगळे,डॉ.अण्णासो लवटे,डॉ.आश्लेषा मासाळ,डॉ .धनश्री रायभान तसेच हॉस्पिटल मधील सर्व मेडिकल ऑफिसर्स, नर्सिंग स्टाफ ,पॅरामेडिकल स्टाफ व सर्व कर्मचारी उपस्थित होते*.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात प्रशासन सतर्क पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गॅस एजन्सी चालकांची घेतली बैठक; अवैध विक्री व साठेबाजीवर कडक कारवाईचा इशारा

अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात प्रशासन सतर्क पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गॅस एजन्सी चालकांची घेतली बैठक; अवैध विक्री व साठेबाजीवर कडक कारवाईचा इशारा.




अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन व घरगुती गॅस पुरवठ्याबाबत खबरदारी घेतली जात असताना सांगोला तालुक्यातही प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच अनुषंगाने आज दि. १३ मार्च २०२६ रोजी सांगोला पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व घरगुती गॅस एजन्सी चालक व मालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. गॅस सिलेंडरचे वितरण केवळ अधिकृत बुकिंगधारकांनाच त्यांच्या बुकिंगनुसार करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य पद्धतीने गॅस सिलेंडर विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

तसेच काही ठिकाणी गॅस सिलेंडरची साठेबाजी करून जादा दराने विक्री करणे, अनधिकृतपणे सिलेंडरचा पुरवठा करणे किंवा एजन्सीच्या नावाचा गैरवापर करणे असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या घरगुती गॅस पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा अडथळा सहन केला जाणार नाही, असेही पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्पष्ट केले.

याशिवाय सांगोला परिसरात गॅस वितरणावर प्रभावी नियंत्रण राहावे आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सांगोला पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकास मदत म्हणून एक अधिकारी व चार अंमलदार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे पथक वेळोवेळी विविध गॅस एजन्सींची पाहणी करून गॅस वितरणाची स्थिती तपासणार असून कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, संभाव्य अफवा, कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने गॅस विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने ही बैठक घेतल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता गॅसचे अनावश्यक साठेबाजी करू नये, तसेच कुठेही अवैध विक्री किंवा साठेबाजी होत असल्याचे आढळल्यास त्वरित पोलीस किंवा पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या बैठकीमुळे सांगोला तालुक्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळेवर खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांच्या हितासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


गुरुवार, १२ मार्च, २०२६

दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,सांगोला येथे एक महिना पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान - उपचार, शस्त्रक्रिया शिबिर*

*दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,सांगोला येथे एक महिना पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान - उपचार, शस्त्रक्रिया शिबिर*
सांगोला येथील जय भवानी चौक येथे असणाऱ्या दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे १ महिना पुर्णपणे मोफत मूत्ररोग निदान उपचार, शस्त्रक्रिया शिबीर याचे आयोजन केले आहे. दिनांक ११ मार्च ते ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सांगली मधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ.आदींन चोपडे यांच्या मार्फत पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित केले गेले आहे.
सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीवरील सूज, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार- लघवी वारंवार होणे, स्त्री व पुरुष यांच्या लघवीच्या मार्गातील अडथडे,लघवीच्या मार्गामध्ये पडदे तयार होणे,लघवी न होणे इ. आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे व मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन दक्षता हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
ज्या रुग्णांना मूत्ररोग संबंधातील शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया केशरी , पिवळे,पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ.आदिन चोपडे यांचेमार्फत दुर्बिणीद्वारे मुतखडा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सदरच्या योजनेसाठी आवश्यक असणारे आयुष्यमान कार्ड देखील या शिबिरामध्ये काढून देण्यात येणार आहे. आयुष्यमान कार्ड साठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये ऑनलाईन रेशन कार्ड अथवा बारा अंकी रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड यांचा समावेश आहे.ज्या नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढायचे आहे त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.सोलापूर व सांगली जिल्ह्यातील सांगोला,मंगळवेढा, आटपाडी, जत,पंढरपूर तालुक्यातील गोर-गरीब गरजू रुग्णांनी खालील फोनवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे संपर्क 9145124579*

महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे: डॉ रचना साळे .

महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे: डॉ रचना साळे .


(मनुश्री संस्थेमार्फत महिला दिनी गरजू महिलांना साहित्य वाटप)

जत:मनुश्री महिला बहुउद्देशिय विकास मंडळ जत यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम बुधवार दि.11 मार्च रोजी जि.प. प्राथमिक शाळा विठ्ठलनगर जत येथे संपन्न झाला.महिला दिनाचे औचित्य साधून या संस्थेच्या वतीने गरजू महिलांना संसारउपयोगी साहित्य, साडी-चोळी व रोख रक्कम देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. रचना साळे-सुर्यवंशी यांनी महिलांना 'आपले आरोग्य आणि आहार' या विषयी मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या कुंटुबातील सर्वांसाठी वेळ देता, त्यातील थोडा वेळ स्वतः साठी दया. भविष्यात येणाच्या विविध व्याधी टाळण्यासाठी योग्य आहार पुरेसी ओप, विश्वांती याकडे विशेष लक्ष दिले पाहीजे तसेच फिजीओथेरपी विषयी माहिती सांगितली व यासाठीमहिलांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे असा संदेश दिला.
         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या संस्थापक सचिवा सौ.नयना सोनवणे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून गेली 11 वर्षे या संस्थेने राबविलेले उपक्रम सांगून कार्याचा आढावा घेतला.तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. नम्रता सुर्यवंशी, उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना लस म्हणाल्या प्रत्येक स्त्री ही संसाराचा कणा आहे. तो कणा मजबूत, निरोगी असल्यास संसार नीटनेटका होतो तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली.यावेळी श्री दिगंबर साळुंखेसर यांनी मनुश्री महिला मंडळाचे विशेष कौतुक केले.आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या दृष्टीकोनातून ही संस्था गेली 11 वर्षे गरजू महिलांना संसारउपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम राबवत आहे. त्यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.प्राथमिक शाळा विठ्ठलनगर जत च्या मुख्याध्यापिका सौ. हसीना शेख मॅडम यांनीही संस्थेचे कौतुक करून कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. सतीश येलपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
        या महिला मंडळास श्री. भास्कर सोनवणे सर श्री. नंदकुमार सुर्यवंशी सर, प्रतिक शिंदे, सागर जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले.संस्थेच्या सदस्या विमल जाधव, राजेश्री शिंदे तसेच सुजाता साळे, प्रिती शिंदे, शिक्षिका वाघमोडे मॅडम, चव्हाण मॅडम,तांबे मॅडम याही उपस्थित होत्या.या संस्थेमार्फत उपस्थित महिलांना आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी गरजू महिलांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

सांगोला तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; मंडल अधिकारी व चालक अडचणीत.

सांगोला तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; मंडल अधिकारी व चालक अडचणीत.

सांगोला : शेतजमिनीच्या खरेदीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून मंडल अधिकाऱ्यांच्या खासगी वाहन चालकास रंगेहात पकडले. या प्रकरणी मंडल अधिकारी आणि त्यांचा चालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार विनोद सिताराम सातपुते यांनी त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक यांनी त्यांच्या खासगी वाहन चालकाच्या मार्फत 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम 7 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
या संदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर 5 मार्च 2026 रोजी संगेवाडी येथील मंडल अधिकारी कार्यालयात पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान चालक वैभव पिराजी मोरे (वय 28, रा. मुंढेवाडी ता. पंढरपूर) याने तक्रारदारांकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक (वय 45) व चालक वैभव पिराजी मोरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7-अ व 12 प्रमाणे सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान 7 हजार रुपये रोख रक्कम, आरोपीचा शर्ट, सापळा कारवाईचे मेमरी कार्ड तसेच दोन्ही आरोपींचे व्हिवो कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत.

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart