Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी :सुनीलबापू लाड 



*चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


सांगोला /प्रतिनिधी: (दशरथ बाबर) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. बदलत्या युगात इतिहास व धार्मिक ग्रंथ अभ्यासणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व गोष्टीत पारंगत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसुर्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य रयतेसाठी सर्वधर्मसमभावाचे असे होते. देव, देश, धर्म रक्षणासाठी जिजाऊंनी पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी देवाकडे प्रार्थना केली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या पिढीने आचरणात आणले पाहिजेत .जिजाऊंनी सार्वभौम राजा घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप मोठे संस्कार केले .छत्रपती शिवाजी महाराजांनी 1644 ला तोरणा किल्ला काबीज करून स्वराज्याचे तोरण बांधले. क्रूर अशा अफजलखानाचा वध करून रयतेला खऱ्या अर्थाने न्याय दिला. चोपडी येथील शिवस्मारक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचेही तैल चित्र लावावे व दररोज पूजन करावे. शिवतीर्थाच्या ठिकाणी गावातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करून त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी आपुलकी व प्रेरणा निर्माण करावी असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी चोपडी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ बाबर हे होते.



चोपडी तालुका सांगोला येथे शिवजन्म उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते  सुनीलबापू लाड यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सुनील बापू लाड, डॉ, नवनाथ बाबर, उपसरपंच पोपट यादव , बाळासाहेब यादव, उद्योगपती सुभाष बाबर, उद्योगपती सतीश पाटील,चेअरमन भिकाजी बाबर, चेअरमन दगडू बाबर, जनार्दन बाबर सर , पत्रकार दशरथ बाबर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समाजासमोर आणणे गरजेचे आहे. जय शिवराय कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चोपडी व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती सोहळा अखंडपणे प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. हा कौतुकास्पद सोहळा निश्चितच गावातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉल्बी मुक्त शिवजयंती उत्सव साजरा करणे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन व्याख्याते सुनीलबापू लाड यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशर माती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रगतशील शेतकरी सतीश पाटील यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू करण्याची प्रथा बाळासाहेब यादव यांनी सुरू केली असून ही प्रथा आजही अखंडपणे मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे . जयंतीनिमित्त सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक , नोकरी , व्यवसाय, शेतीक्षेत्र आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास सलाम केला जातो.  शिवरायांच्या प्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चोपडी गावातील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चोपडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिवप्रेमींनी पारंपारिक मर्दानी खेळ, लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली . भजनी मंडळानेही टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये मिरवणुकीत शोभा वाढवली.तसेच हलगीच्या तालावरती लेझीम खेळाडूंनी आपली कला सादर केली. मिरवणुकीमध्ये अबालवर्धानी सहभाग घेतला होता. जय शिवराय, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून लवकरच शिवस्मारक पूर्णत्वास येईल. शिवजयंती सोहळ्यानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी मोटरसायकल रॅली काढून जनजागृतीबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय ,अशा घोषणा देऊन इतिहासाविषयी जनजागृती केली. प्राथमिक शाळा व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दृष्टिक्षेपात आणला. वक्तृत्व स्पर्धेसाठी राजकुमारशेठ भोसले यांनी 10000 हजार रुपयांचे बक्षीस दिले. तसेच चेअरमन भिकाजी बाबर यांनीही विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. मंडळाने विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळवून दिले. वेगवेगळ्या गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी कबीर मुलाणी व सहकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर गौरवपर पोवाडा सादर केला. सुभाषशेठ बाबर यांनी शिवगौरवपर कविता सादर केली. शिवजयंती सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. आर्मीमध्ये निवड झालेल्या व कार्यरत असणाऱ्या तरुणांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रतीक दत्तात्रय बाबर ,प्रदीप प्रकाश खंडागळे, रितेश संजय खंडागळे,

अतुल दिलीप चव्हाण,सुमित ज्ञानेश्वर बाबर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक प्रगतशील शेतकरी अभिजीत सुरेश बाबर,

गुलाब भीमराव बाबर यांचा सन्मान करून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम करण्यात आला. पुरवठा अधिकारी विशाल मेखले यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बजरंग बाबर व सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील कालिदास जवंजाळ सर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे तसेच कार्यक्रमानिमित्त उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart