झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल ; दिपकआबा साळुंखे पाटील
लोकनेते रामशेठ ठाकूर व दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्याहस्ते नवी मुंबई येथे झेनिथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात बांधकाम क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केलेल्या "झेनिथ कन्स्ट्रक्शन" ही कंपनी आगामी काळात मुंबई आणि नवी मुंबई परिसराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे योगदान देईल असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. झेनीथ कंपनीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, कंपनीने दर्जेदार निवासी, व्यावसायिक तसेच पायाभूत बांधकाम प्रकल्पांची यशस्वी उभारणी करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आधुनिक नियोजन, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे कंपनीने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोजगारनिर्मितीला चालना देत सांगोला तालुक्यातील शेकडो ठेकेदार आणि तरुणांच्या हाताला या कंपनीने काम दिले आहे. एकंदरीत मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणारी ही संस्था भविष्यातही प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन समारंभास माजी महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतमशेठ म्हात्रे , रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, नगरसेविका प्रतिभा भोईर, कार्यक्रमाचे नियोजक ज्येष्ठ नेते गणेशदादा कडू आदी मान्यवरांसह झेनिथ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा महेश पाटील, जितेश पाटील, तेजस पाटील, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संपूर्ण परिवाराला नूतन कार्यालयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नव्या कार्यालयाच्या माध्यमातून कंपनीने अधिक दर्जेदार आणि लोकाभिमुख प्रकल्प साकारत विकासाला गती द्यावी, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात आणि बांधकाम क्षेत्रात यशाची नवी उंची गाठावी, अशा सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.
चौकट
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल दिपकआबांचे गौरवोद्गार
मुंबई आणि नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. ते खऱ्या अर्थाने राज्याचे भीष्मपितामह आहेत. उद्योग व्यवसाय आणि राजकारणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात म्हणजे परीस आहे असे गौरवोद्गार काढत झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हात लागला आहे आगामी काळात या व्यवसायाचे नक्कीच सोने होणार असा विश्वास माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
फोटो ;




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा