जवळा गाव आणि परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न
सांगोला : तालुका प्रतिनिधी
राजकारणात जय - पराजय होत असतात, एखाद्या पराजयाला खचून जाणारे साळुंखे कुटुंबीय नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे शत्रू किती मोठा आहे यापेक्षा आपल्यातील फितूर किती आहेत हे ओळखायला सुरुवात केली आहे. पाठीमागून चर्चा उठवण्यापेक्षा आणि रडीचा डाव न खेळता मैदानात येऊन सामना करावा असे ठणकावून सांगत, जवळा गावच्या आणि चार वाड्याच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं केले जाईल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावच्या विकासाला चालना देण्यासाठी साळुंखे पाटील कुटुंबिय कधीही मागे हटणार नाही असा विश्वास माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
कार्यतपस्वी आमदार कै. काकासाहेब साळुंखे पाटील बहुउद्देशीय भवन या नवीन वस्तूचा उद्घाटन समारंभ व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी जवळा गावाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय दीपस्तंभ सारे शिकूया भारताचे दीपस्तंभ होऊया 25 फेब्रुवारी 2026 पासून रात्री 7 ते रात्री 9 पर्यंत जवळा गावातील मोबाईल आणि टीव्ही पूर्णपणे बंद या संकल्पनेचा शुभारंभ काल मंगळवार दिनांक 24 रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, युवक नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील, भाजपाचे नेते संभाजी तात्या आलदर, सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, अरुणभाऊ घुले सरकार, सुनील आबा साळुंखे पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रसाळ यांच्यासह ग्राम पंचायतीचे आजी-माजी सदस्य, तंटामुक्तीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ मंडळी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, आत्मपरीक्षण करून पुढे कामाला सुरुवात केली आहे. गावच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामध्ये इथून पुढच्या काळात कोणताही कागद आणायसाठी आता सांगोल्याला हेलपाटे मारावी लागणार नाहीत. कारण प्रत्येक कार्यालय आता एका छताखाली सुरू होत आहे. यामधून जवळा आणि जवळच्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांची निश्चितपणाने गैरसोय दूर होणार आहे. एक फूट जागा कोण कोणाला देत नाही अशा परिस्थितीत साळुंखे पाटील कुटुंबीयांनी प्रमुख चौकातील जागा दिली आहे. ही साळुंखे पाटील कुटुंबीयांची दानत आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आज शासकीय इमारतीचे उद्घाटन होत असताना मला मनस्वी आनंद आहे. कारण आपल्याच गावातील वयोवृद्ध नागरिक महिला मुलींच्या शाळेची कामे या एकाच ठिकाणी होणार आहेत. कागदासाठी आता सांगोला जाण्याची गरज नाही. ही व्यवस्था होत असताना कार्यतपस्वी आमदार काकासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे काम आमच्यातून घडत आहे यातच मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी म्हणाले, सायंकाळी मोबाईल आणि टीव्ही बंद करून जवळा गावाने सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा आदर्श इतर गावांनी तालुक्यांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. यासह जवळा गावात एकाच छताखाली सर्व विभाग कार्यरत होणार असल्याने शासकीय योजना राबवताना सोयस्कर होणार आहे. यामध्ये प्रत्येक योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सज्जन मागाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जवळा व पंचक्रोशीतील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चौकट :
अतोनात प्रयत्नांतर शासकीय सर्व विभागीय कार्यालय एकाच छताखाली सुरू होणार आहेत. यामधून शासकीय कामे आपल्याच गावात पूर्ण होणार असून, सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामकाजाला गती मिळणार आहे. यामधून निश्चित पणाने नागरिकांच्या अडीअडचणी दूर होतील असा विश्वास आहे. हे शासकीय कार्यालय आपल्या श्री नारायण मंदिराच्या पावन नगरीत सुरू होत असून हे आपले भाग्य आहे.
ॲड . यशराजे दीपकआबा साळुंखे पाटील





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा