Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

 “निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून लढवली.... ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील

पराभवानंतरही जनतेच्या दारी!”* 


 *ॲड.सूर्यादित्य (यशराजे) साळुंखे पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटातील 13 गावांत जाऊन मतदारांचे मानले आभार.......* 


सांगोला तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटातून युवा नेते ॲड. सूर्यादित्य उर्फ यशराजे दीपकराव साळुंखे पाटील यांचा अल्प मतांनी पराभव झाला. मात्र पराभवाने खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी जनतेच्या भेटीगाठींचा दौरा सुरू करत, “निवडणूक ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेचे साधन आहे,” हा संदेश कृतीतून दिला.

जवळा जिल्हा परिषद गटातील संगेवाडी, मांजरी, बामणी, मेथवडे, सावे, राजापूर, वाढेगाव, देवळे, मेडशिंगी, आलेगाव, वाकी-घेरडी, वाणीचिंचाळे व जवळा अशा एकूण १३ गावांमध्ये जाऊन त्यांनी मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधत, “पराभव झाला म्हणून घरात बसणार नाही; तुमच्या सुख-दुःखात कायम उभा राहीन,” असा शब्द दिला.

या आभार दौऱ्यात वाढेगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या सौ. वंदना भरत शेळके तसेच जवळा पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या आलेल्या सौ. पुनम सुदर्शन इंगवले यांनीही विविध गावांमध्ये उपस्थित राहून मतदार बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. दोन्ही मान्यवरांनी “जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे रूपांतर विकासकामांमध्ये करून दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत आगामी काळातही एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “गत निवडणुकीत आपण जनतेसमोर जी वचने दिली होती, ती कामाच्या स्वरूपात पूर्ण करण्याचा प्रयत्न यापुढेही जोमाने सुरू राहील. झालेला पराभव विसरून आपण विकासाच्या दिशेने एकत्र वाटचाल करूया.”

या निवडणुकीत सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी सांगितले, “यशाने यंदा हुलकावणी दिली असली तरी अपयशाने मी खचणार नाही. आमच्या साळुंखे पाटील कुटुंबाच्या रक्तातच जनसेवा आहे. लोकसेवेची बांधिलकी भविष्यातही तेवढ्याच ताकदीने जपणार आहे.”

या आभार दौऱ्यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींच्या डोळ्यांत अश्रू तर काहींच्या आवाजात जिद्द दिसून आली. “कार्यकर्त्यांच्या भावना हीच माझी खरी शिदोरी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.


तसेच आजपासून संपूर्ण जवळा गटासह सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात तरुणांशी संवाद साधून तरुणांची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पराभवाच्या सावटातही सेवाभाव, जिद्द आणि जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा निर्धार व्यक्त करत ॲड.यशराजे साळुंखे पाटील यांनी आगामी काळातही लोकहितासाठी अविरत कार्यरत राहण्याचा शब्द दिला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart