*लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेत पत्रकार दिन उत्साहात साजरा*
*पत्रकारिताच लोकशाहीचा चौथा स्तंभ – एड. गजानन भाकरे*
सांगोला | लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगोला शाखेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तज्ज्ञ संचालक अॅड. गजानन भाकरे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रा. राजेंद्र ठोंबरे, मनोज उकळे सर, डिजिटल पत्रकार निखिल काटे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पतसंस्थेचे विभागीय अधिकारी अंबुरे, शाखाधिकारी दिवसे, तसेच पत्रकार व समाजसेवक राजेंद्र यादव उपस्थित होते. यादव यांना देखील सन्मानित करण्यात आले..
यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. गजानन भाकरे म्हणाले, “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. राज्यकर्ते असोत किंवा सत्ताधारी यंत्रणा—ते फक्त लेखणी आणि पत्रकारालाच घाबरतात. शासनावर योग्य तो अंकुश ठेवण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारांकडे आहे.” निर्भीड, प्रामाणिक आणि समाजाभिमुख पत्रकारितेची आज नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पत्रकार मनोज उकळे यांनी सत्काराला उत्तर देताना लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे आभार मानले. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी पत्रकारितेच्या कार्याची दखल घेणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन सांगोला शाखेच्या वतीने करण्यात आले असून, पत्रकार व संस्थांमधील समन्वय अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे शाखाधिकारी दिवसे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाज व लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे योगदान अमूल्य असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा