-जिद्द, मेहनतीने दुष्काळी पट्ट्यात उभा केला यशस्वी गांडूळ खत प्रकल्प
-आज सत्तर वर्षांनी बहुतांश खेड्यांमध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल झाले. शैक्षणिक सुधारणा झाल्या, रस्ते झाले, कुडा-मेढीच्या घरांची जागा आरसीसी घरांनी घेतली, बलुतेदार पध्दत जवळपास संपली आहे, टीव्ही, मोबाईल, दळवळणाची साधनं घरोघरी पोहचली आहेत. एकंदरीत भौतिक विकास झाला आहे. मात्र, या अंगभूत विकासातही कृषी व्यवस्थेचे चित्र तसे काहीसे बदलले नाही. पारंपरिक पिकांएवेजी आधुनिक पिके घेण्याचा कल अन जिथं पाटाच्या पाण्यावर पिकं जगायची तिथं ठिबकच्या पाण्यावर पिके फोफावतायत इतकाच काय तो बदल. मात्र, या बदलातही अनेकांनी कृषी व्यवस्थेचे जे चांगले मूळ रुप होते त्याला नवा आयाम देत ही व्यवस्था समृद्ध केली. ही आधुनिक समृध्दताच आज काळ्या मातीत सोनं पिकवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. राज्यभरातील हा समृद्धतेचा वारसा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढे नेला आहे. यातील एक धडपडणारा शेतकरी म्हणजे वाटंबरे (ता.सांगोला) येथील सुरेश पवार. माणदेशी पट्ट्यातील या शेतकऱ्याने उभ्या राज्याला हेवा वाटावा अशा गांडूळ प्रकल्पाची उभारणी करत राज्यभरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळी भागात शेती परवडत नाही म्हणत रडगाणे गाणाऱ्यांना सुरेश पवार यांनी नवी दिशा तर दिलीच पण क्रिएशन, क्रिएटिव्हीटीचा एक नवा आयामही दुष्काळी पट्ट्याला घालून दिला. आपल्या यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेली गांडूळ खते आज राज्यभर लोकप्रिय आहेत.माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापासून राज्यभरातील अनेक कृषीतज्ज्ञांना त्यांच्या या नाविन्यतेच्या उपक्रमाची भुरळ पडली आहे. सुरेश पवार हे माणनदीच्या तीरावर वसलेल्या वाटंबरेतील एक हाडाचे शेतकरी. सुरुवातीला डाळिंब शेतीत ते रममाण झाले होते. स्वत:च्या शेतीला गांडूळ खत वापरण्याकडे त्यांचा कल होता. गांडूळ खतामुळे फळे उत्तम व उत्कृष्ट दर्जाची तयार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या खताचे महत्व ओळखले. आपण स्वत:च हे खत का तयार करू नये असा प्रश्न त्यांना पडला अन यातूनच यशराज ॲग्रो इंडस्ट्रीजचा जन्म झाला. २०१९ मध्ये त्यांनी स्वत:च गांडूळ खत निर्मितीला प्रारंभ केला. सुरुवातीला पाच बेडच्या माध्यमातून सुरु झालेला हा प्रवास आज ५० बेडपर्यंत पोहचला आहे. प्रारंभीला ९० हजार रुपये खर्चून त्यांनी या प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली. टप्प्या टप्पयाने बेड वाढविल्यान उत्पान व विक्री यांचा ताळमेळ साधला गेला. सध्या ९० बाय ३२ फूटाचे शेड तयार करुन यामध्ये बेड टाकण्यात आले आहेत. पहिल्यांदाा १५०० किलो शेणखत तयार करुन ते बेडमध्ये भरून घेण्यात येते. त्यानंतर सलग चार दिवस दररोज शंभर लिटरपर्यंत पाणी शिंपडले जाते. चौथ्या दिवशी प्रत्येक बेडमध्ये पाच किलोप्रमाणे गांडूळ कल्चर सोडले जातात. त्यानंतर बेड बारदानाने झाकून ठेवले जातात. त्यानंतर दरराेज ५० व २० लिटरप्रमाणे पाणी शिंपडले जाते. त्यानंतर खत तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. अडीच महिन्यात भुशभुशीत खत तयार होते. पवार यांच्याकडे एका बेडमध्ये एक टन इतके खत तयार केले जातात. दोन महिन्यात ५० टन खत तयार करुन त्याची राज्यभरात विक्री होते. विशेष म्हणजे वर्षाला चार ते पाच बॅच खताच्या काढल्या जातात.४० किलोच्या गोणीमध्ये पॅक करुनच यशराज गांडूळ खत या नावाने त्याची विक्री होते. उत्तम प्रतीचे खत तयार करताना ज्याला खत दिले त्याच्या शेतीची समृद्धता वाढली पाहिजे हा पहिला नियम पवार परिवाराने अंमलात आणला. त्यामुळे व्यवसायिकतेपेक्षा स्वत:चा विश्वासार्हतेचा ब्रॅड या परिवाराने तयार केला आहे. क्वॉटिंटीपेक्षा क्वॉलिटी हे यशराज ॲग्रोच्या गांडूळ खताचे वैशिष्ट राहिले आहे. हा विश्वासच आज राज्यभरातील प्रगतशील शेतकऱ्यांना यशराज ॲग्रोच्या गांडूळ खताकडे वळायला भाग पाडत आहे. विशेष म्हणजे व्हर्मिवॉशमध्ये सुरेश पवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या उत्तम दर्जाच्या व्हर्मिवॉशला राज्यभरातून मोठी मागणी आहे. अल्पभूधारक शेतकरी ते गांडूळ प्रकल्पातील एक धडपड्या उद्योजक अशी सुरेश पवार यांची ओळख सध्या राज्यभर गडद होऊ लागली आहे. शेती, माती अन संस्कृतीशी नातं सांगणारा हा युवक आपल्या कामाशी अन तत्वाशीही तितकाच प्रामाणिक आहे. जे जे नवं ते ते हवं ही त्यांची नाविन्यतेची अपेक्षाच त्यांच्या गांडूळ प्रकल्पातील विकासाला उभारी देत आहे. त्यांच्या या प्रकल्पाला पत्नी अन मुलांचीही मोलाची साथ आहे. या प्रकल्पामुळे आसपासच्या अनेकांना रोजगार मिळाला आहे. शेतीत नवं काही केलं तर त्याला यश मिळतेच हा धडाच या माणदेशी माणसाने राज्यभरातील शेतकऱ्यांना दिला आहे. कामावर निष्ठा, जिद्द अन चिकाटीच्या जोरावर एखादा अल्पभूधारक शेतकरी लाखो शेतकऱ्यांचा कसा आयडॉल बनू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण सुरेश पवार यांनी घालून दिले आहे. राज्यभरातील नामवंत वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल, यूट्यूबर्सवर पवार यांच्या यशकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. कोल्हापूर आकाशवाणी केंद्रानेही पवार यांची मुलाखत घेत ती शेतकऱ्यांना ऐकविली आहे. मात्र, हा अवलिया जमिनीवर पाय ठेवून काम करणारा आहे. प्रसिद्धीची हवा डोक्यात न जाऊ देता स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हे त्यांचे वैशिष्ट. त्यांची ही नैतिकताच त्यांच्या यशराज गांडूळ प्रकल्पाच्या विकासाला चार पावले पुढे घेऊन जात आहे. संकटे आली तर त्यावर रडत न बसता त्यावर मार्ग शोधला पाहिजे हेच सुरेश पवार यांनी आपल्या कृतीतून दिले आहे. त्यांची ही कृषी क्षेत्रातील आधिनुक विचारांची पायवाट लाखो शेतकऱ्यांना समृद्ध दिशेने नेत आहे.
दिपाली देवकर, राज्य कर निरीक्षक. पुणे (९९६०२२५७२८)


.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा