Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २१ जून, २०२४

बारामतीच्या कृषिदुतांनी केले 'शून्य ऊर्जा शीत कक्षाबद्दल' शेतकऱ्यांना मार्गदर्शन.

*बारामतीच्या कृषिदुतांनी केले 'शून्य ऊर्जा शीत कक्षाबद्दल' शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
निमसाखर,/प्रतिनिधी : दि. २१ निमसाखर, ता. इंदापूर येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांचे आगमन झाले असून ते याठिकाणी वास्तव्य करून शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करत आहेत.
           वाढत्या तापमानामुळे भाजीपाला, फळे लवकर खराब होतात. तसेच बाजारामध्ये आवक जास्त असल्यामुळे दर कमी राहतात. अशा वेळी काढणीपश्‍चात साठवण सुविधेच्या अभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी घरगुती पद्धतीने कोणत्याही ऊर्जेशिवाय चालणाऱ्या आणि कमी खर्चात बनवता येणाऱ्या शीतकक्षाची उभारणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले गेले.
       कायम सावली राहणाऱ्या ठिकाणी सपाट अशा जमिनीवर विटांचे एक ते दोन थर देऊन शीतकक्षाच्या तळाचा भाग तयार करावा. या दोन विटांमधील रिकाम्या जागी बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्यात दोन भिंतीतील अंतर ७.५ सेंमी ठेवावे. हे दोन भिंतीमधील अंतरसुद्धा वाळूने भरून घ्यावे. अशा रीतीने वाळू आणि विटांच्या साह्याने हौद तयार करून घ्यावा. हा कक्ष प्रथम भरपूर पाण्याने चांगला ओला करून घ्यावा. या तयार झालेल्या कक्षावर झाकण्यासाठी नारळाच्या झावळ्या किंवा कोरड्या गवताचे छप्पर तयार करावे. त्याने शीतकक्ष झाकून घ्यावा. नियमितपणे दिवसातून दोन वेळा शीतकक्षावर पाणी मारावे. वाळू आणि विटांमध्ये सतत ओलावा व गारवा राहतो ज्यामुळे शीतकक्षातील तापमान बाह्य तापमानापेक्षा १० ते १२ अंश सेल्सिअस कमी राहते. 
         या घरगुती शीतकक्षामुळे भाजीपाल्यांचा साठवण कालावधी वाढतो. सर्व फळे व पालेभाज्या टवटवीत, आकर्षक राहतात. फळांची पिकण्याची प्रक्रिया मंद गतीने होते. त्यांच्या वजनात घट येत नाही.आपल्याला किती शेतीमाल साठवायचा आहे, त्यानुसार या शीतकक्षाचा आकार कमी जास्त करता येऊ शकते. यामध्ये शेतकऱ्यांकडे सामान्यतः उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केलेला असल्यामुळे कमी खर्चात तयार होतो.
      याप्रसंगी सुरेश गोरे , अनिल माळी, श्रीकृष्ण बोंद्रे, नंदकुमार शिंदे, भानुदास गोरे व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषीदुत योगेश घोडे, ऋषिकेश बनसोडे, शंतनु गावंडे, प्रथम बिरादार, चैतन्य भोसले, अनंत हरक, ओमकार भिलारे, नितांत भोसले हे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart