सांगोला : सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या तालुका संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये गाडे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सिद्धेश्वर गाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी तालुका पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक कामात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी भाजपचे कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत पक्षाचे दैनंदिन कामकाज, कार्यकर्त्यांशी समन्वय तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीपणे पार पाडत आहेत.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना सरचिटणीस सिद्धेश्वर गाडे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. यापुढे तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटन अधिक मजबूत करणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना जोडणे, युवकांना संधी देणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यावर भर राहील.”
तालुक्यात भाजपची संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ पातळीवरील रचना मजबूत करणे, महिला व युवक आघाड्यांचे कार्य सक्रिय करणे यासाठी पाठपुरावा करेन असे त्यांनी सांगितले. गाडे यांच्या निवडीमुळे सांगोला तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा