Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोळ्यात उत्साहात उद्घाटन लोककलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकणगावकर यांचे हस्ते उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी

 



उन्मेष सृजनरंग २०२५” युवा महोत्सवाचे सांगोळ्यात उत्साहात उद्घाटन

लोककलाकार व लोककला अभ्यासक योगेश चिकणगावकर यांचे हस्ते उद्घाटन

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी



सांगोला (प्रतिनिधी):

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, व सांगोला तालुक्यातील उच्च शिक्षण मंडळाच्या सांगोला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उन्मेष सृजनरंग २०२५” या चार दिवसीय विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सवाचा सांगोल्यात उत्साहात प्रारंभ झाला.



या प्रसंगी सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककला अभ्यासक मा. योगेश चिकणगावकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे होते.


उद्घाटन प्रसंगी बोलताना चिकणगावकर म्हणाले, “लोककला, संस्कृती आणि सृजनशीलतेतून समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते. युवांनी आपल्या कलागुणांद्वारे भारतीय परंपरेचा संदेश जगभर पोहोचवावा.”

लोकसंस्कृती, शिक्षण आणि सामाजिक समतेवर भाष्य करताना त्यांनी भावनिक शैलीत सांगितले –



“हजार मुलांमागे दोनच मुली कमी आहेत, कारण आपण त्या मुलींना जन्म घेऊ देत नाही. तीच मुलगी आई, बहीण, मावशी, मामाची मुलगी असते — विचार करायला हवे.”

“प्रत्येक घरात एक शिवबा, एक सावित्री जन्माला यावी,” असे आवाहन करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे सांगितले.


चिकणगावकर यांनी लोकगीतांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील पारंपरिक ‘पिंगळा’ कला पुन्हा जिवंत केली आणि “माझ्या जिजाऊने पुऱणपोळी केली हो फकला, हो बापाच्या बाप वाच शिवबा झाला” या गीताने वातावरण भारावून टाकले.


या प्रसंगी स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबुराव गायकवाड यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ कला सादरीकरण नसून विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित सहकार्य व सृजनशीलतेचा सण ठरेल.”


कुलगुरूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “युवा महोत्सव म्हणजे विद्यापीठातील विविध संस्कृतींचा संगम आहे. अशा मंचामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळतो, संघभावना आणि संस्कार यांचा विकास होतो.”


ही स्पर्धा पारंपरिक पद्धतीने पार पडते. जिंकणारे नव्हे तर भाग घेणारेच खरे विजेते आहेत. पुरोगामी दृष्टिकोन ठेवून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक प्रा. संगीता महादेव यांनी सांगितले, “आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून एकत्र प्रयत्न केले. सांगोला महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी सर्वांनी एकात्मतेने सहकार्य केले आहे.”


या चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला, साहित्य, वादविवाद, पोस्टर सादरीकरण, आणि लोककला अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.


एकूण ५३ महाविद्यालयांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असून सांगोला शहरात सणासारखा उत्साह दिसून येत आहे.


कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक प्रा. संगीता यांच्यासह रश्मीकांत तांबे (प्र.क.), ललिता लटके (प्र.क.), वसंत शिंदे (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. अनिता शिंदे, सुनील पवार, उदय देशमुख, शुभांगी पवार, प्रा. संगीता महादेव, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गांनी आयोजनात योगदान दिले.


कार्यक्रमाच्या यशासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले असून विद्यापीठ परिसरात रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. या निमित्ताने सांगोला शहरात सांस्कृतिक रंगांची उधळण पाहायला मिळाली आहे.





No comments