देशाच्या सेवेसाठी सैन्य दलात दाखल झालो हे माझ्या जीवनातील मोठे यश--सुभेदार अमोल बाबर
देशाच्या सेवेसाठी सैन्य दलात दाखल झालो हे माझ्या जीवनातील मोठे यश--सुभेदार अमोल बाबर .
(चोपडी येथे सुभेदार अमोल बाबर यांचा सैन्य दलातील सेवानिवृती निमित्त सन्मान सोहळा संपन्न)
सांगोला प्रतिनिधी/ दशरथ बाबर --माझ्या कुटुंबातील आम्हा तीन भावंडांपैकी कोणीतरी देशाच्या सेवेसाठी भारतीय सैन्य दलात दाखल व्हावे ही आई-वडिलांची ईच्छा होती. त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू होते . 14 मार्च 2006 रोजी भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन कोअर मध्ये नोकरीची संधी मिळाली. सन 2007 साली सैन्य दलात शपथविधी पार पडला. सैन्य दलात दाखल झाल्यानंतर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत मोठ्या जिद्दीने देशसेवा करीत उच्च पदापर्यंत पोहोचलो व देश सेवेची 19 वर्षे पूर्ण करीत सेवानिवृत्त झालो. देशाच्या सेवेसाठी भारतीय सैन्य दलात दाखल झालो हे माझ्या जीवनातील मोठे यश आहे. असे प्रतिपादन चोपडी गावचे सुपुत्र सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांनी चोपडी येथे रविवार दि .2 मार्च रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, सुभेदार अमोल कृष्णा बाबर, मातोश्री सिंधुताई कृष्णा बाबर व सुविद्य पत्नी अनुजा अमोल बाबर, माजी सैनिक पांडुरंग शिंदे उपस्थित होते.
पुढे बोलताना सुभेदार अमोल बाबर म्हणाले, मला माझ्या कुटुंबाकडून देश सेवेची प्रेरणा मिळाली व वडील हे माध्यमिक शिक्षक असल्याने लहानपणापासूनच शिक्षणाच्या बाबतीत प्रोत्साहन मिळाले. वडील कृष्णा बाबर सर (नाना) आज असते तर खूप आनंद झाला असता . देशसेवेची त्यांची ईच्छा पूर्ण केली.
यापुढे मी गावातील तरुण मुलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव उपलब्ध आहे. गावातील कोणत्याही चांगल्या कार्यासाठी व समाजसेवेसाठी मी व माझे कुटुंब सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय सैन्य दलात अग्निवीर पॅटर्न चांगला असून तरुणांनी शारीरिक, मानसिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन सैन्य दलात दाखल व्हावे. त्यासाठी आपण मार्गदर्शन करू व गावचे नाव उज्वल करण्यासाठी आपले भावी जीवन व्यतीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, भारत मातेची सेवा करून सुभेदार अमोल बाबर सेवानिवृत्त झाले. पूर्वी कुठेच नोकरी लागत नाही म्हटल्यावर अनेकजण भारतीय सैन्यदलात दाखल होत होते. सैन्य दलात सैनिक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्याने आपण सुरक्षित आहोत. सुभेदार अमोल बाबर यांना काही अडचण आल्यास त्यांनी माझ्याकडे यावे त्या अडचणी दूर केल्या जातील. येत्या दोन महिन्यात आमदार म्हणून तालुक्याच्या सेवेमध्ये दाखल होणार असा आत्मविश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. चोपडी गावाने बुद्धेहाळ तलावाचा टेंभू योजनेत समावेश व्हावा यासाठी केलेली मागणी व घेतलेले परिश्रम त्यामुळे चोपडी गावासह बुध्येहाळ तलाव लाभक्षेत्रातील गावांना शेतीच्या पाण्याचा लाभ मिळाला हे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात बुद्धेहाळ तलावाचा तळ दिसू देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. सुभेदार अमोल बाबर यांनी भविष्यात कौटुंबिक जबाबदारी बरोबर शेती व सामाजिक कार्य अविरतपणे पुढे न्यावे. यांचे भावी जीवन सुखकर आनंदायी व व्हावे अशा सदिच्छा दिल्या.
उद्योगपती सतीश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले की, सुभेदार अमोल बाबर कुटुंबाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. सुभेदार अमोल बाबर हे शालेय जीवनामध्ये खूप हुशार असल्याने त्यांना भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन कोअरमध्ये नोकरीची संधी मिळाली. गावातील अनेक सामाजिक कार्यामध्ये अमोल बाबर यांचा कायमच सहभाग असून भविष्यातही राहील. जय शिवराय कला, क्रीडा व संस्कृतीक मंडळ चोपडी, समस्त ग्रामस्थ चोपडी, श्री भोजलिंग देवस्थान समिती रानमळा, आजी माजी सैनिक संघटना चोपडी, माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला ,जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था सांगोला व विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याकडून सुभेदार अमोल बाबर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त गौरव व सन्मान करण्यात आला.
यावेळी चेअरमन भिकाजी बाबर, शिक्षक वाय. एस. बाबर, पतंगराव बाबर, आर. एस .बाबर, रामचंद्र केंगार, कवी ज्ञानेश डोंगरे , आदेश बाबर, सेवानिवृत्त सुभेदार मेजर रविकांत मराळ आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शालेय जीवनात सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांची आदर्श विद्यार्थी म्हणून ओळख होती. प्राध्यापक डॉ. संजय बाबर, अभियंता गणेश बाबर, सुभेदार अमोल बाबर हे त्रिमूर्ती गावच्या सामाजिक, धार्मिक व इतर कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. सांस्कृतिक , धार्मिक, कौटुंबिक,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख आहे. स्व. के. एस. बाबर यांचे कुटुंब जीवनाच्या सर्वच पातळीवर यशस्वी ठरले आहे. प्रत्येक व्यक्तीने सैन्य दलातील आजी-माजी सैनिक व कुटुंबाचा आदर सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सुभेदार अमोल बाबर हे भारतीय सैन्य दलात सेवा बजावून जन्मभूमीत आले आहेत. अमोल बाबर यांनी गावातील तरुणांना देश सेवेमध्ये नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे अमोल बाबर यांना शेती व सामाजिक कार्याची आवड आहे ती त्यांनी यापुढे जोपासावी.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, तालुका अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर ,डॉ.निकिताताई देशमुख यांनी सुभेदार अमोल बाबर यांचा सन्मान केला.
यावेळी अभियंता गणेश बाबर आभार प्रदर्शनात म्हणाले, आमचे कुटुंब गावातील सामाजिक व इतर कार्यासाठी सदैव तत्पर असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील तरुणांनी प्रेरणा व आदर्श घेऊन आपले जीवन देशाच्या सेवेसाठी सार्थकी लावावे. सुभेदार अमोल बाबर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व आजी - माजी सैनिक, मान्यवर यांचा गौरव व सन्मान करीत कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुनील जवंजाळ सर, व राहुल बाबर यांनी केले.
बातमीला फोटो आहेत.
सुभेदार अमोल बाबर हे भारतीय सैन्य दलातून आर्मी एज्युकेशन कोअरमध्ये 19 वर्षे देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल सेवापूर्ती सन्मान सोहळा बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोपडी या ठिकाणी संपन्न झाला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चोपडी गावचे कवी ज्ञानेश डोंगरे यांनी सुभेदार अमोल बाबर यांच्या सन्मानार्थ सैनिक जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील, आजी-माजी सैनिक संघटना, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित व मान्यवर, नागरिक युवावर्ग , नातेवाईक,महिला भगिनी यांच्या उपस्थितीत गावातून सवाद्य मिरवणूक व फटाक्यांची आतशबाजी करीत जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. गावातून मिरवणूक काढून गावच्या वतीने मोठ्या जल्लोषात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी सुभेदार अमोल बाबर यांचा सन्मान केला.तसेच अमोल बाबर यांचे ज्येष्ठ बंधू प्राध्यापक डॉ. संजय बाबर यांनी शिक्षण क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती घेतली त्याबद्दल यांचाही या कार्यक्रमादरम्यान सन्मान करण्यात आला.अमोल बाबर कुटुंबीयांकडून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय शिवराय कला, क्रीडा व संस्कृतीक मंडळ, श्री भोजलिंग देवस्थान समिती व ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर, युवा वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments