Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०२४

आम. शहाजीबापूसारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवा-नाम.रामदासजी आठवले

 आम. शहाजीबापूसारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवा-नाम.रामदासजी आठवले 





सांगोला/ प्रतिनिधी-

राज्यात महायुती सरकारने चांगल्या प्रकारे कार्य केले आहे. महायुती सरकारच्या काळात अनेक योजना मार्गी लावल्या. समाजातील प्रत्येक घटकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात दलीत समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. बापूंनी दलित समाजासाठी 100 कोटी निधी खर्च करून समाजाचा विकास साधला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व विधानसभेत पाठवण्यासाठी बापूंना सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी सांगोला येथे केले. 

सांगोला मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये नाम.रामदासजी आठवले बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख ,भाजपच्या नेत्या राजश्रीताई नागणे पाटील ,तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, शिवसेनेचे नेते विजय शिंदे, दलित समाजाचे सोलापूर जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी ,मान्यवर, तसेच मागासवर्गीय सेल तालुकाअध्यक्ष दीपक ऐवळे, राजू गुळीग, रामस्वरूप बनसोडे, कीर्तीपाल बनसोडे, दामोदर साठे,  भाजपच्या  सोलापूर जिल्हाउपाध्यक्षा शितल लादे, जिल्हाचिटणीस संगीता चौगुले ,विधानसभा समन्वयक  वैजयंती देशपांडे, शहराध्यक्षा मनीषा देशपांडे, शिवसेना शहरसंघटक आनंदाभाऊ माने, रुकसाना मुजावर आदी उपस्थित होते

पुढे बोलताना नाम. रामदासजी आठवले म्हणाले, दलित पॅंथरच्या चळवळीपासून  आमदार शहाजीबापू पाटील व माझी मैत्री आहे. शहाजीबापूंनी तालुक्याच्या प्रत्येक गावात विकास केला आहे. दलित समाजासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे. तुम्ही मी कधी येणार याची वाट पाहत होता. परंतु मी बापू कधी आमदार होतील याची वाट पहातोय .शहाजीबापू एक धाडसी नेतृत्व आहे. ते पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. परंतु राज्याच्या राजकारणात मोठी क्रांती करून शहाजीबापू महायुतीचे नेते बनले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने राज्यात विकासाभिमुख कार्य करून लोकप्रियता मिळवली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार हे काँग्रेससोबत गेले परंतु काँग्रेसने शरद पवारांना प्रधानमंत्री होण्यापासून रोखले. भाजप सरकार संविधान बदलेल अशी भीती राहुल गांधी घालतात .मी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असल्याने संविधान बदलायची कोणाच्या बापाची हिंमत नाही. संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर माझा समाज त्याला टराटरा फाडून टाकेल. खोटा प्रचार करून समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. सांगोला तालुक्यातून शहाजीबापूंना निवडून आणण्यासाठी मी आलो आहे. महायुतीला राज्यात चांगला प्रतिसाद आहे .तालुक्यातून आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे .

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गेल्या 35 वर्षात मी चळवळ उभी केली. चळवळीच्या माध्यमातून मला तालुक्याचा विकास करून दुष्काळावर मात करता आली.येत्या वर्षभरात सांगोला तालुक्यात हरित क्रांती झालेली पाहायला मिळेल .महायुती सरकारने सांगोला तालुक्यासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी दिला. मी दलित समाजासाठी100 कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे. 5 वर्षाच्या कालखंडात तालुका सुरक्षित ठेवला. तालुक्यातील सर्व समाजाला निधी देऊन विकासाच्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन जात आहे. तालुक्यात शंभर कोटी रुपये निधी आणून मागासवर्गीय समाजासाठी आदर्श असे  वसतीगृह करण्याचा संकल्प आहे. महुद गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे चांगले कार्य मी केले आहे. या निवडणुकीत निवडून देऊन पाच वर्ष काम करण्याची संधी द्यावी. दलित समाजासाठी 500 कोटी रुपयांचा निधी आणून समाजाचा परिपूर्ण विकास करण्यास कटीबद्ध आहे‌ असे विचार आम. शहाजीबापू  पाटील यांनी सांगोला ते व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे ,शिवसेना नेते विजय शिंदे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी आपल्या मनोगत सांगितले की, शहाजीबापूंनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास साधला असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 2 कोटी रुपये निधी खर्च केला . तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तसेच महायुती सरकारने दिलेल्या निधीतून कोट्यावधी रुपयाची कामे केली. नाम. रामदास आठवले यांच्या सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल मधील सभेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी सर्वांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे ठामपणे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart