Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

लोकसहभागातून कोळा (वाघडोह)शाळेचे रुपडे पालटले

लोकसहभागातून कोळा (वाघडोह)शाळेचे रुपडे पालटले.

(रंगरंगोटी करीत गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न; शिक्षिका भारती घोडके-दौंड यांचा पुढाकार)
नाझरे वार्ताहर 

सांगोला तालुक्यातील कोळा येथील डोंगर-पाचेगाव रोडवर वाघडोह वस्ती शाळा आहे. डोंगरदऱ्यात वसलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेने लोकसहभागातून शाळा परिसरात, शाळेला सुंदर रंगरंगोटी, पर्यावरणाबाबत संदेश, विविध प्रकारची बोलकी छायाचित्रे, शाळेभोवती विविध प्रकारची झाडे लाऊन शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे ही शाळा लक्ष वेधून घेत आहे. सर्वांच्या सहकार्याने गुणवत्तावाढीसाठी चांगले प्रयत्न असून एक ते चार शाळा आहे. गतवर्षी शाळेच्या पटामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या 'आदर्श शिक्षिका' भारती शहाजी घोडके दौंड यांच्या संकल्पनेतून शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्यामुळे शाळेचे रूप पालटले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचे नुसते नाव घेतले तरी शाळेतील पायाभूत गैरसुविधांचे नजरेसमोर चित्र उभे राहते. पण वाघडोह वस्ती कोळा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अपवाद ठरली आहे. या शाळेचे केवळ रूप बदलले नाही, तर गुणवत्तेसोबतच
नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेने जिल्ह्यात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तेत आघाडी घेतली आहे. शिक्षणाचा दर्जा वाढला असून विद्यार्थ्यांमध्येही शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. शाळेचा कायापालट झाल्याने पटसंख्याही यावर्षी वाढली आहे. शिक्षिका भारती घोडके-दौंड व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पडळकर, आनंद करांडे, गब्बर करांडे, शुभम करांडे, सुरेश काळेल जगदीश कुलकर्णी यांच्या सहकायनि तसेच लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी केली. विविध प्रकारचे नकाशे, तक्ते, सुविचार, शाळेच्या भोवताली पर्यावरणाची चित्रे, घोषवाक्ये, धूम्रपानविरोधी वाक्ये, अशी अनेक प्रकारचे घोषवाक्ये, छायाचित्रे शाळेभोवती काढण्यात आल्याने आदर्शवत शाळा दिसून येत आहे. शाळेच्या प्रांगणाभोवताली हिरवीगार परसबाग केली आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टातून शाळेचे रूप बदलले आहे.






चौकट...

जिल्हा परिषद शाळा वाघडोह वस्ती (कोळा) शाळेवर भारती दौंड या एकच शिक्षिका आहेत. सर्वांना सोबत घेऊन लोकसहभागातून विद्यार्थी व गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न चांगले आहेत. शाळेभोवती पर्यावरणाबाबत रंगरंगोटी करून कौतुकास्पद काम केले आहे.

-अमोल भंडारी, विस्तार अधिकारी कोळे


वाघडोवस्ती ग्रामस्थ कोळा ग्रामस्थ ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या शाळेत अनेक उत्तम शैक्षणिक उपक्रम राबविले असून त्यातून या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. डोंगर भागात शाळा असल्याने शाळेचा परिसर गोरगरीब, वंचित, उपेक्षितांचा आहे. त्यांच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो. लोकांनी मोलाची साथ दिल्यामुळे शाळेत भौतिक सुविधा निर्माण होऊन गुणवत्ता संवर्धनासाठी फायदा झाला. यामुळे शाळेचे रूप बदललेले दिसत आहे.

~श्रीमती भारती घोडके दौंड 
शिक्षिका जिल्हा परिषद वाघडोह वस्ती.

-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart