Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये “चला जाणूया नदीला”उपक्रमांतर्गत व्याख्यान संपन्न .

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये “चला जाणूया नदीला”उपक्रमांतर्गत व्याख्यान संपन्न .

सांगोला/प्रतिनिधी:
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविल्या जात असलेल्या "चला जाणूया नदीला ” या उपक्रमांतर्गत  माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. वैजिनाथ घोंगडे, ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले व सांगोला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमोल पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे विश्वस्त डॉ. यशोदीप गायकवाड व प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते श्री. वैजनाथ घोंगडे हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मान नदीचे “नदी संवाद ” यात्रेचे समन्वयक आहेत. त्यांनी माणदेशातील माण नदीच्या स्वच्छतेसाठी व पुनर्जीवनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की नद्या टिकल्या तर संपूर्ण मानव जात टिकेल तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. यावेळी त्यांनी “माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या” माध्यमातून लोकसहभाग वाढवून व विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने माण नदीचे 75 किलोमीटर नदीपात्र व 18  बंधारे स्वच्छ केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नदी पात्राच्या स्वच्छतेमुळे व पुनर्जीवनामुळे तालुक्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आल्याचे निदर्शनास आणून दिले. 
ग्रामीण साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण जागतिक समस्यांचा विचार करत असताना स्थानिक पातळीवरील समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रत्येकाने आपल्या भागामध्ये असणाऱ्या नद्या, नाले यांची स्वच्छता ठेवून जास्तीत जास्त जलसंवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.प्रत्येकाने किमान दरवर्षी एक झाड लावून त्याची जोपासना करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. व्यापक जलसंवर्धनासाठी केवळ नदीपात्राची स्वच्छता विचारात न घेता त्या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून नियोजन करणे आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
डॉ. अमोल पवार यांनी गाव पातळीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करून लोकसहभागातून पाणी अडविणे व जमिनीत मुरविणे काळाची गरज बनली असल्याचे मत व्यक्त केले. घरामध्ये वापरून बाहेर पडणारे पाणी, शेतात पिकांना वापरलेले जाणारे दूषित पाणी, पावसाळ्यातील गडूळ पाणी, गटारा मधील खराब पाणी यावर विज्ञानाच्या व यांत्रिकीकरणाच्या जोरावर संशोधन करून छोटे छोटे समाज उपयोगी गॅझेट तयार करावेत व त्या पाण्याचा पुनर्वापर कसा होईल असे गॅझेट तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले. यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना संस्थेचे विश्वस्त डॉ. यशोदीप गायकवाड यांनी वैजिनाथ घोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माण नदीच्या स्वच्छतेसाठी व पुनर्जीवनासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून आम्हा नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर .ए. देशमुख यांनी करून कार्यक्रमामागील हेतू विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस .एस. कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पी .सी. चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments