बोरकर सरांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली ; दिपकआबा साळुंखे पाटील
बोरकर सरांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली ; दिपकआबा साळुंखे पाटील
मारुती बोरकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
सांगोला ; तालुका प्रतिनिधी
सोनलवाडी (ता. सांगोला) येथील व सांगोला विद्यामंदिर प्रशालेत ३५ वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य करत समाजाला शिक्षणाचा उजळ मार्ग दाखवणारे मारुती कोंडीबा बोरकर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते.त्यांनी मारुती बोरकर यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शिक्षणसेवेला मनःपूर्वक सलाम केला.
आपल्या मनोगतात दिपकआबा म्हणाले, मारुती बोरकर यांनी ३५ वर्षे निष्ठेने व समर्पण भावनेने शिक्षणसेवा केली. त्यांनी ज्ञानदान हेच खरे दान मानत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. अशा शिक्षकांचा समाजावर प्रभाव अमूल्य असतो. समाज घडवताना शिक्षकांचे योगदान हे महान असते. सरांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या उन्नतीसाठीही कार्य केले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी केवळ शिक्षकाची भूमिका न बजावता समाज घडवण्याचे महान कार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व ज्ञानाचे मूल्य रुजवले. शिक्षक म्हणून त्यांनी दिलेली शिकवण ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर उपयोगी पडणारी आहे. मारुती बोरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत, शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य, आनंद व समाधान लाभो, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सेवापूर्तीच्या या टप्प्यावर मारुती बोरकर अत्यंत भावूक झाले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,"आज मी मागे वळून पाहतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक वर्ग, प्रत्येक शाळेचा दिवस माझ्यासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. मी शिक्षक म्हणून जे काही दिलं, ते मनापासून दिलं. विद्यार्थ्यांच्या यशात मी माझं यश मानतो. या ३५ वर्षांच्या प्रवासात अनेक सहकारी, विद्यार्थी, पालक यांचे प्रेम, सहकार्य लाभले यासाठी मी परमेश्वराचा आणि संस्थेचा आभारी आहे. विद्यादान करत असताना समाजसेवेची लहानपणापासून असलेली आवड ही सारखी मला गप्प बसू देत नव्हती म्हणून मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखे मोठ्या भावाप्रमाणे प्रेम देणारे व माझ्या सामाजिक जीवनामध्ये ते मार्गदर्शक ठरले हे मी माझे भाग्य समजतो आणि त्यांच्याच शुभहस्ते आज माझा सेवापूर्तीचा सत्कार होतो हा योगायोग माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

No comments