डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर
[पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर पुणे शहराध्यक्षपदी महेश टेळे]
पिंपरी, २४ जुलै : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांची पुणे जिल्ह्यासाठी नवीन जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, तर पुणे शहराध्यक्षपदी महेश टेळे यांची निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी याठिकाणी नामांकित कुणाल हॉटेलमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार राजा माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांना संबोधित करताना राजा माने म्हणाले की, डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डिजिटल मीडियातील पत्रकारांनाही प्रिंट मीडियाप्रमाणे स्वतंत्र दर्जा मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत पत्रकारांना नवीन दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्थंभ नसून पहिला स्थंभ आहे, इतर तिन्ही स्थंभ त्यावर अवलंबून आहेत. आज राज्यात साडे बारा हजारहून अधिक सदस्य असलेली हि संघटना निश्चितपणे पत्रकारांच्या हितासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण काम करत आहे. संघटनेतील सर्वच पत्रकार अतिशय निर्भीडपणे आपली ठोस भूमिका मांडत आहेत. त्यांच्यामुळे राजकीय मंडळी आणि प्रशासनावर अंकुश राहत असून शहराच्या किंवा नागरिकांच्या हितासाठी असलेल्या चांगल्या गोष्टीना देखील मिडीयाने चांगली प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे यांनी सांगितले की, या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांसाठी आणि डिजिटल मीडियाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पत्रकारितेतील नैतिकता आणि पारदर्शकता जपण्याचा संघटनेचा मुख्य उद्देशही अंमलात आणणार असल्याचे हुंबे म्हणाले.
यावेळी संघटनेचे सचिव महेश कुगावकर, उपाध्यक्ष नंदकुमार सुतार, प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,राज्य संघटक अमोल पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ नाडे तर आभार प्रदर्शन यशोदा नाईकवाडे यांनी केले.
चौकट
पत्रकारांच्या कुटुंबासाठी ‘प्रतिबिंब’
पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान हे नवसंजीवनी ठरत आहे. केवळ घोषणा नव्हे तर प्रतिष्ठानच्या वतीने मदतीचा ओघ देखील सुरु झाला असून आजवर ११ लाखाहून अधिक रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रतिष्ठान पत्रकारांच्या कुटुंबाचा मोठा सहारा असणार आहे.


No comments