सांगोल्यात जलसंपदा विभागाची क्षेत्रीय विभागीय कार्यालये होणार - चेतनसिंह केदार सावंत
सांगोल्यात जलसंपदा विभागाची क्षेत्रीय विभागीय कार्यालये होणार - चेतनसिंह केदार सावंत
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती निवेदनाद्वारे मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): टेंभू, म्हैसाळ, नीरा, स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या सिंचन प्रकल्पा अंतर्गत सांगोला तालुक्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून सुमारे १६०० हेक्टर वरील सिंचन प्रकल्प प्रस्तावित असून, सदर प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन, प्रकल्प कार्यन्वित करण्यात आले आहेत. प्रशासकीय तसेच क्षेत्रीय कामासाठी लाभधारकांना सुमारे १०० किमी प्रवास करून हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी सर्व सिंचन प्रकल्पाची क्षेत्रीय कार्यालये व विभागीय कार्यालये सांगोल्यात व्हावीत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला यश आले असून सांगोल्यात लवकरच जलसंपदा विभागाची क्षेत्रीय कार्यालये होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
वीर धरणाअंतर्गत नीरा उजव्या कालव्याचे सांगोला शाखा कालवा क्रमांक ४ व ५ द्वारे तालुक्यातील सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. परंतु सदर प्रकल्पाचे विभागीय कार्यालय नीरा उजवा कालवा विभाग फलटण ता. फलटण जिल्हा सातारा येथे आहे. म्हैशाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे व ०.८ टीएमसी इतके पाणी उपलब्ध आहे. सदर योजनेचे विभागीय कार्यालय म्हैशाळ पंपगृह विभाग क्रमांक २ सांगली ता. सांगली जिल्हा सांगली येथे आहे. टेंभू उपसा सिंचन योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टर सिंचनाखाली आहे व ३ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने सिंचन करण्याचे प्रस्तावित आहे.
या योजने अंतर्गत तालुक्यात ४.५ टीएमसी पाणी उपलब्ध असून सदरच्या योजनेचे विभागीय कार्यालय टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी ता. कराड जिल्हा सातारा येथे आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या अंतर्गत तालुक्यातील १३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेचे विभागीय कार्यालय उजनी कालवा विभाग क्रमांक ९, मंगळवेढा ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आहे. याशिवाय तालुक्यात माण नदीवरील १४ को.प.बंधारे, कोरडा नदीवरील २ को.प. बंधारे असून १४ लघु व एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. सदर प्रकल्पावरील सिंचन क्षेत्र सुमारे १० हजार हेक्टर इतके आहे. परंतु सदर प्रकल्पाचे क्षेत्रीय व प्रशासकीय कार्यालय भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आहे.


No comments