(य.मंगेवाडीत यलमार समाजाच्या वतीने आ.शहाजीबापूंचा जंगी सत्कार)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सध्याच्या राजकारणातील सूत्रे बदलली आहेत, गणित बदलली असून राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे. येणाऱ्या पाच वर्षात सांगोला तालुक्यात विकासाचे पर्व आणण्यासाठी विकासाची कावड खांद्यावर घेऊन सर्वांनी हातभार लावावा. संघर्ष जर नशिबात असेल तर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला. कमलापूर ते मंगेवाडी दरम्यान. आमदार शहाजीबापू पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली.
यावेळी सत्कारला उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी सांगोल्याच्या विकासकामांची माझी एकही फाईल अडवली नाही. १९९५ ते १९९९ या काळात शेतीला पाणी मिळाले. त्यानंतर २०१९ ते २०२४ या काळातच सिंचनासाठी पाणी मिळाले आहे. मधल्या काळात पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. विरोधी पक्षातील अनेकांनी माझा गद्दार असा उल्लेख केला आहे. मला कितीही शिव्या द्या, मला कितीही नावे ठेवा माझा विकासकामांचा धडाका सुरुवात राहणार आहे. मी साधाच आमदार असून गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या वाक्यामुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. विकासकामांच्या जोरावर तालुक्याने गरुडभरारी मारली आहे. मनात हिम्मत बाळगल्याने तसेच दिव्य महत्त्वाकांक्षा असल्याने बारामतीपेक्षा सांगोला तालुक्याला सिंचनासाठी सर्वाधिक पाणी मिळत आहे. संघर्ष जर नशिबात असेल तर मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी लढाई खेळावी लागेल. तालुक्यात एमआयडीसी, शासकीय, मेडिकल कॉलेज, शासकीय इंजीनियरिंग कॉलेज, शासकीय फार्मसी कॉलेज आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करायची त्यासाठी सर्वांनी मला साथ द्या असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
यावेळी तातोबा येलपले, लक्ष्मण येलपले, प्रकाश सोळसे, बापू कोळवले, हमुनाना येलपले, विजय येलपले, अमोल पाटील, संदीप कुरे, बाळकृष्ण येलपले, भंडीशेगावचे सरपंच गणेश पाटील, बाळासाहेब यलमार, निवास येलपले, दत्ता यलमर, अशोक यलमर, युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, तालुका संपर्क प्रमुख अभिजीत नलवडे यांच्यासह सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
,
0 Comments