चक्क! वाटंबरे मध्ये रंगला गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा.
चक्क! वाटंबरे मध्ये रंगला गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा.
वाटंबरे/प्रतिनिधी: पहिलं बाळंतपण म्हटलं की सगळं कुटुंब डोहाळं जेवणाची तयारी करायला घेतं. पहिल्या बाळंतपणाला गर्भवतीचं डोहाळे जेवण करणं यात तसं काही नवं नाही. पण कधी तुम्ही एखाद्या गाईचं डोहाळं जेवण घातल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का ? हो हे खरं आहे. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील पवार कुटुंबाने दि.१५ डिसेंबर २०२२ गुरूवारी आपल्या लाडक्या गाईचं डोहाळं जेवण घालून संपूर्ण सांगोला तालुक्यातील शेतकऱ्या समोर आदर्श निर्माण केला आहे. डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली!पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा आनंद साजरा केला.यासाठी त्यांनी चक्क पाहुणे नातेवाईक व मित्रमंडळीना आमंत्रित केल. वाटंबरे येथील प्रगतशील बागायतदार सोसायटी चेअरमन नाना बापू पवार व त्यांचे बंधू रेवन पवार या दोन बंधूंनी त्यांच्या घरी असलेल्या गीर जातीच्या गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला.
या डोहाळे जेवणा दिवशी या गाईला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसुत्र घालून छान नटवण्यात आलं. डोहाळ जेवणासाठी आलेल्या सर्व महिलांनी गाईची ओटी भरत तिला ओवाळत तिला पाच प्रकारची फळे खाऊ घातले या वेळी डोहाळ जेवणाच्या सर्व विधी करण्यात आल्या.
यावेळी प्रगतशील शेतकरी रेवन पवार यांना या डोहाळे जेवणाविषयी माहिती विचारली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की आमचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय आहे स्वतःची दूधडेअरी आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जनावराचे दुग्ध व्यवसायासाठी किती महत्त्व आहे ते सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे . आम्ही ज्या गाईचे डोहाळे जेवण घालत आहे त्या गाईला आम्ही व आमच्या कुटुंबाने तिचा मुलीसारखा सांभाळ केला आहे आपण आपल्या मुलीचा डोहाळे जेवण घालत असतो आम्ही या गाईला मुलीचा दर्जा दिल्यामुळे आम्ही या गाईचा मी व माझ्या कुटुंबाने सर्वांनी मिळून डोहाळे जेवण घालण्याचा निर्णय घेतला होता असे सांगत गाईच्या मायेपोटी चक्क त्यांनी तिचे डोहाळे पुरवले. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे पण हा कृतज्ञ सोहळा पवार कुटुंबीयांनी घालत समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
आज डोहाळ जेवणासाठी आलेल्या सर्व नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या डोहाळ जेवणाविषयी समाधान व्यक्त करत रेवन पवार व त्यांच्या बंधूंनी केलेल्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.



No comments