Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ५ एप्रिल, २०२६

होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड

 होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटनेच्या नूतन सचिव पदी बिरू भंडगे  यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गेजगे यांची एकमताने निवड 



होलार समाज पुरोगामी सामाजिक संघटना तालुका सांगोला सदर संघटनेची बैठक दिनांक ५/४/२०२६ रोजी लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली त्यामध्ये सचिव या पदावर मा. श्री. बिरू भंडगे (पाचेगाव खुर्द) यांची तर उपाध्यक्ष पदावर मा.श्री. विठ्ठल गेजगे (वाटंबरे) यांची नियुक्ती करण्यात आली. 


या निवडीला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. या कामे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष मा.श्री.कुंडलिक भंडगे यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे , उपाध्यक्ष मा. श्री. विजय ऐवळे (चिंचोली), कार्याध्यक्ष मा.श्री. कुंडलिक भंडगे(अजनाळे), नूतन उपाध्यक्ष मा.श्री. विठ्ठल गेजगे(वाटंबरे), सहसचिव ह.भ.प. केशव हेगडे (सोनलवाडी), सदस्य मा.श्री.धनंजय भडंगे, मा.श्री. नारायण भंडगे आदी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे आधारस्तंभ लोकप्रिय आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सदर बैठक उत्साहात पार पडली व संघटनेच्या भावी कार्यास आमदारांनी शुभेच्छा दिल्या. आभार संघटनेचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. मानाप्पा भडंगे यांनी केले.


सोमवार, ३० मार्च, २०२६

स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन

स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी केले अभिवादन
सांगोला ; तालुका प्रतिनिधी 

सांगोला तालुक्याचे कार्यातपस्वी आमदार स्व काकासाहेब साळुंखे पाटील आणि भागवतभक्त स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, ॲड सचिन देशमुख, ॲड यशराजे साळुंखे पाटील, नूतन सभापती पूनम इंगवले, नवनाथ मगर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, चंद्रकांत चौगुले, पंचायत समिती सदस्य बापू जावीर, प्रशांत वलेकर जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे आदीसह मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे हे रविवार दि २९ रोजी आपल्या नियोजित सांगोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जवळा येथील कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व भगवतभक्त स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, सांगोला तालुक्याच्या शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून स्व काकासाहेबांनी सांगोला तालुक्यातील शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले. त्याचबरोबर भगवतभक्त स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला एक आध्यात्मिक संस्कार देऊन खऱ्या अर्थाने तालुक्यात वारकरी संप्रदायाचा अध्यात्मिक विचार रुजवला असेही यावेळी पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांनी स्पष्ट केले. 

रविवार, २९ मार्च, २०२६

चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.

 चोपडी -रानमळा येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन.



सांगोला/ प्रतिनिधी:( दशरथ बाबर): चोपडी (रानमळा) तालुका. सांगोला येथे मंगळवार दिनांक ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री. भोजलिंग यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भोजलिंग यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता श्री. संदीप मोहिते महाराज व अतुल हातेकर महाराज यांचा भारुडाची जुगलबंदी कार्यक्रम आयोजित केला आहे.


 बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सासनकाठीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता महिलांसाठी व पुरुषांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य बक्षिसांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे. तर महिला व पुरुषांसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

 गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत .सकाळी ९ वाजता स्लो बाईक स्पर्धा होतील. संध्याकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता सिद्धेश्वर संगीत भजनी भारुड मंडळ दहिवडी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वाजता भव्य खुला रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा लहान व मोठ्या गटात आयोजित केलेल्या आहेत. लहान गटासाठी अनुक्रमे ७ हजार रुपये ,५ हजार रुपये, ३ हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत . मोठ्या गटासाठी अनुक्रमे २० हजार रुपये,१५ हजार रुपये ७ हजार रुपये, व ५ हजार रुपये असा बक्षीसांचा खजिना देण्यात येणार आहे.यात्रेच्या व कार्यक्रमाच्या संदर्भात अमोल बाबर  ९४२०५६१९५५ व राहुल बाबर ९७६३०४०९५८ या मोबाईल क्रमांकावर  संपर्क साधावा . श्री भोजलिंग यात्रा कमिटी चोपडी (रानमळा) व ग्रामस्थ यांनी या यात्रेचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी भाविक- भक्त व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


शनिवार, २८ मार्च, २०२६

समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

 समर्थ संस्थेमार्फत जत येथे भाषण कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 



वाटंबरे: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थामार्फत'भाषण कला व संवाद कौशल्य' या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे जत येथे 7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध लेखक,वक्ता व प्रभावी भाषण कला प्रशिक्षक मनीष काळे लाभले आहेत.    

              या प्रशिक्षण वर्गामध्ये भाषण कसे करावे,भाषणाची सुरुवात कशी करावी,आत्मविश्वास निर्माण करणे,भाषणासाठी विषय व मुद्दे कसे निवडावे,श्रोत्यांबद्दल माहिती,विषय,सादरीकरण ,भाषणाचे पाठांतर ,विशिष्ट भाषाशैली,भाषण रंगवणे,भारदस्त दमदार आवाज,प्रसंगावधान राखणे ,भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे,भाषणाचा शेवट कसा करावा या सर्व संवाद भाषण कला व संवाद कौशल्याचा सराव व तयारी करून घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर प्रात्यक्षिक व सराव मटेरियल उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असून अत्यंत कमी व माफक प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांनी दिगंबर साळुंखे 9049106853, मनीषा साळे 7385162037 व अभिलाषा कोडग 9359881452 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान समर्थ बहुउद्देशीय एका संस्थेमार्फत करण्यात आले आहे.


शुक्रवार, २७ मार्च, २०२६

श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले

 श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले



श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त वासुद येथे पारंपरिक मल्लविद्येचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या कुस्त्या रंगल्या. एकूण सुमारे पाच लाख रुपयांचे इनाम मल्लांना वितरित करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.




या मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या तब्बल ₹1,00,000 इनामाच्या कुस्तीत नेपाळचे पैलवान देवा थापा यांनी हिमाचल प्रदेशच्या नदीम चौहान यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. तसेच सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी आटपाडीच्या रणजीत आगलावे यांच्यावर विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.इतर झालेल्या कुस्त्यांमध्ये खवासपूरचे अर्जुन चव्हाण यांनी म्हसवडच्या प्रसाद फुकळे यांचा पराभव केला. खवासपूरचे करण खटके यांनी दत्ता बोडरे यांच्यावर मात केली, तर पियुष वाडेकर (खवासपूर) यांनी आटपाडीच्या भैय्या खरात यांना चितपट केले.




       काही कुस्त्या अत्यंत चुरशीच्या ठरल्या. कामतीचे सुलेखान शेख व बामणीचे विनोद शिनगारे तसेच कुंभारीचे सुशांत शेजुळ व खवासपूरचे विकास निंबाळकर यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या, ज्यामुळे प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले.इतर निकालांमध्ये खवासपूरचे गणेश आवताडे यांनी आटपाडीच्या यश देवकते यांचा पराभव केला, तर मानेगावचे ज्ञानेश्वर सावंत यांनी खवासपूरच्या विकास कोळी यांच्यावर विजय मिळवला.

            या भव्य मैदानाचे आयोजन वासुद येथील जुने हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. तसेच लहान व मोठ्या कुस्त्यांचे सामने हनुमान मंदिर परिसरात दुपारी 1 वाजल्यापासूनच रंगले होते, ज्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमास वस्ताद कृष्णा शेंडगे (सर), दगडू चौगुले, बजवळकर बुवा बडरे, दादा व्हनमाने, सहदेव लेंडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्वतः आखाड्यात उतरून पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

        कुस्ती निवेदनाची जबाबदारी क्रीडा भूषण पुरस्कारप्राप्त पैलवान कृष्णा शेंडगे (सर) यांनी प्रभावीपणे पार पाडली. यावेळी सागर पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अतुल पवार, योगेश खटकाळे, गुंडा दादा खटकाळे ,मोहन बापू आलदार, डॉ.शिवराज भोसले, डॉ.विजय बंडगर,डॉ.महेश राऊत,डॉ.महादेव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


श्रीराम मंडळाचे सदस्य:


भीमराव सावंत, प्रकाश केदार, वसंतराव शिंदे, शहाजी पाटील, विठ्ठल नाना केदार, सुभाष शिंदे, पोपट भोरे, अरविंद केदार, राहुल भोरे, सुनील भोरे, दत्ता केदार, प्रकाश भोरे, सुनील केदार, अशोक गोरे, अशोक शास्त्री, गोपाळ मराळ, राहुल केदार, गोपी केदार, डॉ. निरंजन केदार, अंकुश सावंत, मधुकर पवार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

        एकंदरीत, वासुद येथील या भव्य कुस्ती मैदानाने श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करत पारंपरिक मल्लविद्येला नवे बळ दिले. गावकऱ्यांनी व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



शुक्रवार, २० मार्च, २०२६

ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी

 ऑनलाइन सेवा ही काळाची गरज : डॉ.रवींद्र आरळी



(समर्थ संस्थेच्या श्रेयस ऑनलाईन सेंटरचे उद्घाटन संपन्न)


जत: समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत श्रेयश कॉम्प्युटर व ऑनलाइन सर्विस सेंटर चे जत येथे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी व नगरसेविका संगीता सोनुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी यांनी शुभेच्छा देताना सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांकडे वेळ कमी असल्याने ऑनलाइन सेवा ही एक काळाची गरज बनली आहे. संस्थेने लोकांना कमी वेळेत व माफक दरात चांगल्या सुविधा देऊन आपला नावलौकिक वाढवावा. यावेळी नगरसेविका संगीता सोनुले मॅडम यांनी शुभेच्छा देताना समर्थ संस्थेने जत मधील महिलांना व्यवसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यास मदत करावी त्यासाठी आम्ही लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.





          यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. केंद्र संचालिका मनीषा साळे यांनी प्रस्ताविकामध्ये संस्थेमध्ये ऑनलाइन सुविधा बरोबर विद्यार्थ्यांसाठी व महिलांसाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. केंद्र संचालिका अभिलाषा कोडग यांनी महिलांसाठी गृह उद्योगांचे प्रशिक्षण देऊन महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजश्री उबाळे व आभार मयुरी सावंत यांनी मांडले. या कार्यक्रमास परशुराम ऐवळे, गोपाल पाथरूट,अविनाश सोनुले, वैभव जगधने,कविता मराठे,स्वाती बडचीकर, शारदा कांबळे,सुशील चव्हाण सर, कल्पना कणसे, विजय सावंत, परिक्षित चव्हाण,प्रताप चव्हाण,ज्योतीराम सावंत,पुनम सावंत,नयना सोनवने,भास्कर सोनवणेसर,प्रकाश कदम यांच्यासह जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

 वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन


वाटंबरे (ता. सांगोला) : गावातील सामाजिक व धार्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने येत्या रविवारी वाटंबरे येथे सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान खंडोबा मंदिरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ह. भ. प .मा. प्राध्यापक रामेश्वर महाराज जाधव , प्रमुख वक्ते योगेश शामराव कुलकर्णी, मातृशक्ती श्रीमती अर्पणाताई माणिक साळुंखे या मान्यवरांचे मार्गदर्शन, धार्मिक प्रवचने तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास वाटंबरे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संमेलनात हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून युवकांनाही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावात प्रथमच हिंदू संमेलनाचे आयोजन असल्यामुळे  या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart