Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना शिवाजी विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान*

*प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना शिवाजी विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान*

*शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापन दिन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान*
सांगोला (प्रतिनिधी) 
             रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्यांना दिला जाणारा आदर्श प्राचार्य पुरस्कार 2024 शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापन दिन समारंभात दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.(डॉ.) सुरेश गोसावी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.(डॉ.) डी. टी. शिर्के व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
               शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करून विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्राचार्यांना दरवर्षी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 
         प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आपले संपूर्ण शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका योजनेतून पूर्ण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आपले विद्यापीठीय शिक्षण डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. मराठी विषयाचे अभ्यासक असलेले प्राचार्य डॉ. मेनकुदळे शिवाजी विद्यापीठाचे मराठी संशोधन मार्गदर्शक म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.फिल. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी होऊन विविध विषयावर आपली भूमिका त्यांनी सातत्याने स्पष्ट केली आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय एक महान कर्मयोगी : कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनाचा वसा आणि वारसा, चिपळूणकर पूर्व निबंध : संकल्पना आणि स्वरूप यासारख्या ग्रंथाचे लेखन केले असून यांनी घडवला महाराष्ट्र, प्रसार माध्यमाचे बदलते स्वरूप आणि नोकरीच्या संधी, समीक्षा सिद्धांत आणि व्यवहार यासारख्या अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे. मराठी साहित्याचे अभ्यासक त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 
            रयत शिक्षण संस्थेच्या विविध अधिकार पदांवर त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली असून संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे सदस्य, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव त्याचबरोबर उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली आहे.
            प्राचार्य म्हणून डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी श्रीपदतराव कदम महाविद्यालय, शिरवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा अशा विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी विशेष प्रयत्न करून महाविद्यालयाचा लौकिक उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात बी.व्होक इन नर्सिंग, एम. ए. इकॉनॉमिक्स, बी.ए. भूगोल 
यासारखे विविध विषय आणि विद्याशाखा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती (नॅक) बेंगलोर यांच्याकडून 'ए' हे मानांकन प्राप्त झाले आहे. याबरोबरच महाविद्यालयास रयत शिक्षण संस्थेचा आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त करून देण्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविद्यालयात चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी त्यांनी विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिली आहे. ग्रंथालय अभ्यासिका, संगणक प्रयोगशाळा, त्याचबरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाविद्यालयाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का कुंभार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे तर तेजल शिंदे यांनी सांस्कृतिक क्षेत्रात विद्यापीठाच्या माध्यमातून उत्तुंग असे यश संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली आणि महाविद्यालयाची ओळख निर्माण केली आहे. एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ती आज महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात कार्यरत आहे. एकूणच महाविद्यालयाच्या संख्यात्मक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना विद्यापीठीय शिक्षणाबरोबर कला क्रीडा साहित्य अशा विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देऊन महाविद्यालयाला अल्पावधीतच शिवाजी विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण करून देण्याचा प्रयत्न प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केला आहे. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाने सन 2024 या शैक्षणिक वर्षाचा आदर्श प्राचार्य हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 
       प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी गेल्या 30 वर्षात अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या क्षेत्राबरोबरच प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले शैक्षणिक पुरस्कार, बॅरि. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संस्थेचे सचिव मा.विकास देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, नाना मेनकुदळे व इतर विविध संघटनांनी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments