निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून शहाजीबापू नातेवाईकांच्या राजकारणात गुरफटले
. शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांची शहाजीबापूंवर सडकून टीका
सांगोला : तालुका प्रतिनिधी
रोजगार हमी..काम कमी..निम्मं आम्ही..निम्मं तुम्ही अशी टोळी मतदारसंघात कार्यरत आहे. टक्केवारीच्या नादात मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली. पाण्याअभावी लेकरासारखी जपलेली पिके मातीमोल झाली आहेत. मतदारसंघात आचारी जास्त झाल्याने स्वयंपाक बिघडला आहे. मतदारसंघात टक्केवारीचे राजकारण सुरू असल्याने जनतेत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून शहाजीबापू पाच वर्षे नातेवाईकांच्या राजकारणात गुरफटले. मतदारसंघावरचा अंधकार दूर होऊन विजयाची मशाल हाती घेऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गावात प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी. झपके, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश देठे, नितीन खाडे, शिवाजीराव बनकर, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, इमाम मुलाणी गुरुजी, संभाजी हरीहर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राजश्री ताड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, हक्काच्या पाण्यासाठी आजही लढा द्यावा लागतो ही मतदारसंघाची शोकांतिका आहे. मतदारांनी हक्काच्या मतांचा अधिकार पिढ्या घडविण्यासाठी करावा. सर्वांगीण विकास साधायचा असेल तर संघर्ष आणि क्रांती करावी लागेल. मी निवडून आल्यानंतर सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्याने हजारो तरुण बेरोजगार आहे. पाच ठिकाणी एमआयडीसी आणून तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम करणार आहे. जिकडं दीपक आबा असतो.... तिकडं गुलाल असतो...आता मी स्वतः उभा आहे...त्यामुळे दिपकआबांच्या विजयाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. मला निवडून दिले तर माझी आमदारकी जनतेसाठी असेल. पाच वर्षे तुमचा सालगडी म्हणून काम करेन अशी ग्वाही दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी. झपके म्हणाले की, काहींना गद्दार म्हटलं तर त्यांना राग येतो. बंड करायचं होतं तर गुजरात आणि गुवाहाटीला का जावं लागलं. राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाल्याने महायुतीला लाडकी बहीण आठवली. स्व. काकासाहेब साळुंखे यांनी पहिल्यांदा सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडली. दिपकआबांची साथ मिळाली नसती तर स्व.गणपतराव देशमुख यांचा विश्वविक्रम झाला नसता. दिपकआबांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी. झपके यांनी केले.
0 Comments