शेतीमाल उत्पादक घटकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा: प्रशांत चासकर .
शेतीमाल उत्पादक घटकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा: प्रशांत चासकर .
{महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सांगोला येथे शेतमाल तारण योजना कार्यशाळा संपन्न}
सांगोला: शासनाच्या कृषी विभाग , आत्मा यंत्रणा , महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ , महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सांगोला येथे शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी 11ते 2 या वेळेत शेतमाल तारण कर्ज योजना, जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली .या कार्यशाळेस सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, महिला बचत गटांचे फेडरेशन, सहकारी संस्था, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक , सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचा सहभाग होता . कार्यशाळा मार्गदर्शनाच्या माध्यमातून या घटकांचा सहभाग वाढेल व वखार महामंडळात जास्तीत जास्त शेतीमाल साठवण्यासाठी येईल . त्यातून शासनाचा व पर्यायाने उत्पादकांचाही फायदा होईल हा उद्देश होता. या कार्यशाळा कार्यक्रमात गोदाम उभारणी,गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान,गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना , महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना या विषयावर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य समन्वयक प्रशांत चासकर यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले .
पुढे बोलताना प्रशांत चासकर म्हणाले ,शेतकरी, व्यापारी , शेती उत्पादक बचत गट ,शेतीमाल उत्पादक कंपन्या यांनी शासनाच्या गोदाम व्यवस्थेचा लाभ घ्यावा. राज्यात 1296 शासकीय वखार महामंडळाची गोदामे आहेत. सांगोला येथे 1 हजार 490 मॅट्रिकटन क्षमतेचे गोडाऊन आहे. तर 840 मॅट्रिकटनाचे कोल्ड स्टोअरेज आहे. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मालाचे संरक्षण होते, शेतमाल तारण योजना राबवली जाते व सर्व सेवा सुविधा उपलब्ध आहेत .आज रोजी सांगोला वखार महामंडळ गोदामामध्ये शेतकऱ्यांचा सुमारे 65 मॅट्रिक टन विविध प्रकारचा शेतीमाल आहे. तर व्यापाऱ्यांचा 340 मेट्रिक टन माल, व नाफेड चा 64 तन माल गोडाऊनमध्ये आहे . गोडाऊनमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक असून शेतीमाल उत्पादक घटकांनी शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा. गोदामामध्ये शेतीमाल ठेवण्यासाठी आधारकार्ड, सातबारा उतारा आवश्यक आहे. गोदामामध्ये ठेवलेल्या मालावर मालाच्या किंमतीच्या 70 टक्के पर्यंत कर्ज वखार महामंडळ देत आहे .तरी शेतकरी, व्यापारी, शेतीमाल उत्पादक कंपन्या यांनी जास्तीत जास्त शेतीमाल गोदामामध्ये ठेवल्यास स्वतःचा व शासनाचाही फायदा होईल असे सांगितले. कार्यक्रमास सर्व घटकातील सुमारे 150 व्यक्तींचा सहभाग होता सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, सांगोला वखार केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला जिल्हा- सोलापूर येथे घेण्यात आला. याप्रसंगी उमेद अभियानाचे महिला बचत गट, कृषी विभाग व आत्मा यंत्रणेचे शेतकरी गट, शेतकरी कंपनीचे संचालक, सहकार विभागाच्या सहकारी संस्था, व्यापारी वर्ग उपस्थित होता.
शेतकरी बंधूंनी चालू रब्बी हंगामात शेतमाल लगेच न विकता वाळवून, स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात साठवावा. महामंडळामार्फत शेतकरी वर्गास गोदाम भाड्यात 50 टकके सूट व शेतकरी उत्पादक कंपनीस गोदाम भाड्यात 25 टक्के सूट मिळणार असून 9 टक्के दराने तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतमालाचे बाजारभाव वाढल्यानंतर शेतकरी वर्गाने थेट शेतमाल विकून आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सांगोला वखार महामंडळ साठा अधीक्षक महेश सलगरे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
शेतकरी वर्गाने उत्पादन खर्च कमी करून योग्य बाजारभाव मिळविण्याच्या अनुषंगाने वखार महामंडळाच्या गोदाम पावती योजनेचा लाभ घ्यावा असे सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी शेतकरी वर्गाला आवाहन केले. या कार्यक्रमास विभागायी व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे विक्रम कुंभार मानभूमी शेतकरी उत्पादक कंपनी कडलाचे अध्यक्ष अमोल गायकवाड व कृषी विभागाचे पोळ साहेब यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments